बरे झाले, महात्मा गेला, माणूस राहिला - Page 366

३२४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

गांधीची अहिंसा ही मुळातच अहिंसेची विटंबना होती. हिंदुस्थानात पूर्वापार जी अहिंसा प्रतिपादण्यात आली आहे, तिची व्याख्या, तिची मर्यादा आणि तिचा व्याप तुकारामाने आपल्या एका अभंगात पूर्वीच सांगून टाकलेला आहे.

दया तेचि नांव भूतांचे पालन |

आणिक निर्दळण कंटकांचे |I

ही जी तुकारामाने केलेली अहिंसेची व्याख्या तीच अहिंसेची खरी व्याख्या आहे 'आणिक निर्दळण कंटकांचे' हा या तुकारामाच्या व्याख्येतील भाग अत्यंत महत्वाचा आहे. गांधीनी तो भाग काढून टाकून अहिंसा म्हणजे 'भूताचे पालन' हाच तेवढा भाग घेऊन 'आणिंक निर्दळण कंटकांचे' हा भाग गाळून अहिंसेची

अतिव्याप्ती केली.

अहिंसेची ही अतिव्याप्ती करण्याच्या मुळाशी गांधींचा स्वार्थ होता. जगद्वंद्य होण्याची, जगन्मान्य गांधीला जेवढी हाव आहे तेवढी कोणालाही नसेल. जगप्रसिद्ध होण्याचा सोपा मार्ग म्हणून गांधीने आत्यंतिक अहिंसेची घोषणा केली. याशिवाय आम्हाला दुसरे काही कारण दिसत नाही. आत्यंतिक अहिंसा, शत्रूचा प्रतिकार न करता त्याला प्राणनाश, द्रव्यनाश, लुटालूट, जाळपोळ करू देणे हे विघातक आहे, हे गांधीला कळत नाही, असे म्हणता येणार नाही.

हिंदुस्थानात गेल्या वीस वर्षात हजारो हिंदू-मुसलमानांचे दंगे झालेले आहेत. आणि त्यातल्या त्यात मुंबई इलाख्यामध्ये आणि मुंबई शहरामध्ये हिंदू-मुसलमानांच्या दंग्याची संख्या सर्वांपेक्षा अधिक होती, असे म्हणावयास काहीच प्रत्यवाय नाही. हिंदू-मुसलमानांच्या दंग्यांत मुंबई शहरामध्ये हिंदूची प्राणहानी व द्रव्यहानी झाली. तिची दखलगिरी गांधीला पूर्णपणे होती. पण त्यावेळीं गांधीने आपली अहिंसा आवरती घेऊन प्रतिकार करा, असा उपदेश करणे गांधीला सुचले नाही, याचे कारण अहिंसेच्या घोर परिणामाकडे पाहण्याला गांधीला काही प्रयोजन वाटले नाही. पण अहमदाबादचे हिंदू हे गांधीला परके नव्हते. आणि अहमदाबाद येथे मुसलमानांनी हिंदुवर केलेला अत्याचार हा काही परकीयावर झालेला अत्याचार नव्हे. अहमदाबादचे हिंदू म्हणजे परकोय नव्हते. गांधी सन्याशी असले तरी गुजराथ आपली मातृभूमी आणि अहमदाबादचे हिंदू म्हणजे आपला पोटचा गोळा; ही भावना त्यांना सुटली नाही. अहिंसेने पोटच्या गोळ्याचा घात झाला !! अहिंसेची चूड, जिने जगाला मार्ग दाखविला होता, तिने आपलेच घर पेटले हे जेव्हा गांधींनी पाहिले, तेव्हा ते शुद्धिवर आले आणि अहिंसेला

तिलांजली देण्यास तयार झाले !!