बुद्धजयंती आणि तिचे राजकीय महत्त्व - Page 374

332 डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

बंधन घालून देणे हे धर्माचे क्षेत्र आहे. ही बुद्धाची भूमिका होती. परमेश्वर प्राप्ती हे धर्माचे क्षेत्र आहे, ही भूमिका बुद्धाला कबूल नव्हती. एका बाजूने परमेश्वर प्राप्तीसाठी यज्ञ करावयाचा, आणि दुसऱ्या बाजूने आपल्या शेजाऱ्याला छळावयाचे, त्याला उपद्रव होईल असे वर्तन करावयाचे, ही धर्माची विटंबना आहें असे बुद्धाचे म्हणणे होते. ब्राह्मणी धर्माचा तिसरा आधारस्तंभ जो वर्णाश्रम धर्म त्याच्यावर तर बुद्धाने फारच मोठा मारा केला. ब्राह्मणी धर्माची सारी मख्खी या वर्णाश्रम धर्माच्या कल्पनेत सामावलेली आहे. जातीभेदाच्या जन्मजात उच्चनीच कल्पनांचा फैलाव होण्यास वर्णाश्रम धर्मच कारणीभूत ठरला आहे. या ब्राह्मणी धर्मात स्त्रिया व शुद्रांना मानाचे स्थान नाही, उपजीविकेचे मार्ग मोकळे नाहीत, कशावर स्वामित्व नाही, म्हणून या दोन वर्गाना स्वातंत्र्य नाही. ही त्यांची जिवंतपणीची अवदशा. ही अवदशा मेल्यानंतरही त्यांच्या पाठी आहेच | ब्राह्मणी धर्मात स्त्रियांना व शूद्रांना मेल्यावर मोक्ष नाही. कारण ब्राह्मणी धर्माच्या तत्त्वाप्रमाणे ज्याला संन्यास घेता येतो त्यालाच मोक्ष प्राप्त होऊ शकतो. आणि शूद्रांना व स्त्रियांना संन्यास देण्याची ब्राह्मणी धर्माने मनाई केलेली होती. बुद्धाला उच्चनीच भाव मान्य नव्हता. 'ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ” हे अघोरी तत्व मुळापासून खणून काढण्याचा बुद्धाने निकराचा प्रयत्न केला. सामाजिक समतेचा बुद्धाइतका मोठा पुरस्कर्ता जगात दुसरा झाला नाही असे म्हटले तरी त्यात अतिशयोक्ती झाली, असे कोणालाही म्हणता यावयाचे नाही. ब्राह्मणी धर्मात स्त्रियांना मोक्ष नव्हता. पण बुद्धाने स्त्रियांना भिक्षुकिणी केल्या. ब्राह्मण धर्मात शूद्रांना मोक्ष नव्हता. बुद्धाने शूद्रांना भिक्षु केले. यावरून बुद्ध समतेच्या तत्त्वाचा नुसता पुरस्कार करून स्वस्थ बसला असे नाही, समता अमलांत आणण्याचा त्याने प्रयत्न केला. नुसत्या स्त्रियांना व शूद्रांना भिक्षू केले इतकेच नव्हे तर अंत्यजानासुद्धां भिक्षूच्या उच्च पदावर चढविले.

वरील विवरण अगदी त्रोटक असले तरी बुद्धाने या देशात किती महत्त्वाची कामगिरी केली याची कल्पना वाचकांस येऊ शकेल असे आम्हांस वाटते. बौद्ध धर्माची तत्त्वे जितकी ओजस्वी व कल्याणकारी होती तितकाच बौद्ध धर्माचा प्रसार अचाड प्रमाणात झाला. दक्षिणेकडे सिलोन व पॅसिफिक महासागरांतील असंख्य लहानसहान बेटांतून बुद्धाच्या धर्माने आपले अधिष्ठान बसविले आहे. पश्चिमेस ब्रह्मदेश, आसाम, सयाम, चीन, जपान येथवर बुद्ध धर्माचा प्रसार झाला. जत्तरेस तिबेट, नेपाळ, तुर्कस्तान येथवर त्याने मजल मारली. इतकेच नव्हे तर अफगाण लोकांना बौद्ध धर्मीय केले. इतका प्रसार कोणत्याही धर्माचा झाला नाही. बुद्धाच्या धर्माचा आणखी एक विशेष सांगण्यासारखा आहे. सर्वच धर्म आपल्या गुणांच्या