९५
दंगा झाला ! दंगा झाला !
काय उपाय नाही त्याला !
मुंबई शहरामध्ये गेल्या एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासून हिंदू मुसलमानाच्या दंग्याला सुरवात झाली. याच्यापूर्वी अहमदाबाद शहरात हिंदू मुसलमानाचा दंगा झाला. अहमदाबादचा दंगा चालू असताच कानपूर येथे हिंदू मुसलमानाचा दंगा झाला व लागोलाग बिहारमध्येही हिंदू मुसलमानांचे दंगे झाले आहेत. हे दंगे होण्यापूर्वी बंगाल प्रांतामधील डाक्का शहरी हिंदू मुसलमानाच्या दंग्यास सुरवात होऊन त्याचा वणवा बराच पेटला होता. हिंदू मुसलमानांचा दंगा हा एक नेहमीचाच ठराविक प्रकारचा विधि होऊन बसला आहे. ज्याप्रमाणे लोक याब्रेला जमा होतात, त्याचप्रमाणे दंग्याला लोक उपस्थित होतात. असा हा प्रकार होऊन बसला आहे, फरक इतकाच की यात्रा कधी येणार याचा काळ वेळ ठरविलेला असतो. पण दंगा कधी होईल हे मात्र कोणी सांगू शकत नाही. परंतु दंगा झाला तर त्यात कोणाला नवल विषेश काही वाटत नाही. एकमेकाने एकमेकावर जरब बसवावयाची, मारावयाचे आणि मरावयाचे ही हिंदू मुसलमानांच्या संयुक्त जीवन क्रमाची तऱ्हा होऊन बसली आहे. म्हणून या विषयासंबंधाने लिहिणे अवश्य आहे. मुंबईतील चालू असलेल' दंगा हा पूर्वीच्या दंग्यापेक्षा काहीसा निराळ्या प्रकारचा आहे, असे आम्हास पूर्वीपासूनच वाटत होते. या दंग्यात पूर्वीच्या दंग्यापेक्षा मोठी काहीतरी नासाडी झाली आहे किंवा प्राणहानी झाली आहे, असे म्हणता येणार नाही. हा दंगा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४२ लोक जिवानिशी मारले गेले. २२२ लोक जखमी झाले. १८५० मवाली लोकांना डांबून ठेवण्यात आले आहे. पूर्वीच्या दंग्याच्या तारतम्याने हा दंगा छोटा म्हणावयास पाहिजे. परंतु या दंग्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचे कारण हे की ह्या दंग्याला काहीच कारण नाही. यापूर्वी जे दंगे होत असत, त्या दंग्यात उभयपक्षात तेढ उत्पन्न होण्याकरिता काहीतरी तत्कालिक कारण घडून आल्याचे सांगता येत असे. कधी दंगा मशिदीवरून हिंदू वाद्य वाजवीत गेल्यामुळे झालेला आहे, कधी मुसलमानांनी इदीच्या दिवशी गाय कापली, यामुळे दंगा झालेला आहे. या दंग्याला असे काही निमित्त घडले आहे असे कोणीच सांगू शकत नाही. यातच या दंग्याचे वैशिष्ट्य आहे. .