एका मातंग गृहस्थाच्या पत्रास उत्तर - Page 383

९६
एका मातंग गृहस्थाच्या पत्रास उत्तर

' श्री. देवीदगसराव नामदेवराव कांबळे (निजामस्ट्रेट) या मातंग समाजसेवक विद्यार्थ्याने बाबासाहेबांना पत्र पाठवून अनेक प्रश्‍न उपस्थित केले होते. त्यातील प्रमुख प्रश्‍न हा होता की, बाबासाहेब हे फकत महार लोकांसाठीच सामाजिक कार्य करीत असतात व ते फक्त महार लोकांनाच जवळ करीत असतात. त्यांनी हे धोरण सोडून द्यावे आणि अस्पृश्य समाजातील सर्व जमातीसाठी कार्ये करावीत

व त्यांच्यांतील समाजसेवकांना जवळ करावे. या पत्रांतील मुद्यांना बाबासाहेबांनी

उत्तरे दिली. त्या उत्तरात त्यांच्या अर्धवट दुःखित भावनांचे आणि अर्धवट संतापजनक verre प्रतिबिंब पहावयास मिळतेच पण त्यांचा महारेतर जातीतील समाजसेवकांकडे पहाण्याचा दृष्टीकोन कसा व तसा का होता याचेही चित्र पहावयास मिळते. एरवी भावनांच्या आहारी न जाणारे बाबासाहेब त्यांच्या भावनांना उचंबळून वर आणणारे अनपेक्षित प्रसंग उद्भवले आणि विशेषतः ते प्रसंग एखाद्याच्या आगाऊपणामुळे उद्भवले तर ते आपल्या भावना मोकाट, स्वैर शब्दात व्यक्त न करता वक्रोक्ति, व्याजोक्ति, उपहास वगैरे साहित्यिक अलंकारांच्या द्वारे सुंदर पण जोरदार शब्दांत व्यक्त करीत असत, याचा त्यांचे हे उत्तर एक उत्कृष्ट नमुना आहे. श्री. कांबळे यांचे हे पत्र १४-६-१९४१ च्या जनतेत (पा-५) छापलेले होते व बाबासाहेबांचे उत्तर अग्रलेख म्हणून त्याच अंकात छापले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्तर आणि ते पत्र खालीलप्रमाणे :

“ रा. रा. देवीदासराव नामदेवराव कांबळे यांस अनेक . . . .,

आपणास काय मायना लिहावा याबद्दल मी बुचकळ्यात पडलो आहे. नमस्कार. म्हणावा तर आपण दोघेही ब्राह्मण नाही, जोहार म्हणावा तर आपण मांग, फूरमान म्हणावे तर मी महार, आशीर्वाद म्हणावा तर मांगाला आशीर्वाद देणारा महार श्रेष्ठ कोण असा अपवाद यायचा, म्हणून काहीच न लिहिता चांगदेवासारखी कोरी जागा ठेवून, आपल्या पत्राचे उत्तर देत आहे. महार समाज व महार पुढारी मातंग जातीवर अन्याय करीत आहेत त्याबद्दल आपले मनातील " खुडखुडी “ (मला वाटते, खुमखुमी या मराठी शब्दाचा हा निजामशाही अपभ्रंश असावा) काढून टाकण्याकरिता व एकदाचा " सोक्षमोक्ष” करून घेण्याकरिता पत्र लिहिण्याचे योजिले. यात आपण कांहीच वावगे केले नाही. आपण मला ' परमपूज्य '