३४६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
असोत. मांग-चांभार स्वतंत्र मजूर पक्षात नसले म्हणून मांग जातीचे किंवा चांभार जातीचे काही नुकसान झाले आहे, असे मला दिसत नाही. स्वतंत्र मजूर पक्ष महारांचा असला तरी तो महारांकरता भांडत नाही, तो भांडतो साऱ्या अस्पृश्यांकरता, भांडणामुळे जो लाभ होतो त्याचे वाटप करणे हे त्यांच्या हाती नाही, ते हाती आहे काँग्रेसच्या, महारांच्या पदरात शून्य, असे वाटप जर काँग्रेसने केले नाही, तर ती काँग्रेस कसली | स्वतंत्र मजूर पक्षाने हानि केली असेल ती महारांचीच. आपण, महार लोक मांगावर जुलुम करतात असे लिहिले आहे. तो प्रकार आमच्याकडे नाही, आमच्याकडे उलट प्रकार आहे. चांभारांनी, मांगानी काही खोडी काढली तरी महार-गप्प असतात. त्यांना ठाऊक आहे की, मी या बाबतीत त्यांचा पक्ष घेणार नाही. आणि आपण बहुसंख्याक आहोत तेव्हा सोसले पाहिजे; अशी जबाबदारी त्यांना वाटते. आपल्याकडे उलट प्रकार आहे, याबद्दल खेद वाटतो. महारांविरुद्ध निजाम सरकारकडे दाद मागावी अगर आपण सत्याग्रह करावा. त्याला माझा पाठिंबा राहील.
शेवटी येंव करा, त्येंव करा नाहीतर तुमचे मार्ग भिन्न अशी आपण जी निकराची भाषा वापरली आहे, तिच्यासंबंधी दोन शब्द लिहिणे आवश्यक आहे. अशी भाषा आपण वापरली नसती तर बरे झाले असते, गोवेकरीण जशी वाटेल तेंव्हा अडते, किंवा बेगुमान झालेली बायको सल्या, पुल्या करून, 'घे मेल्या तुझे मंगळसूत्र' (असे म्हणून) तोडाबथास तयार होते मग क्रंटाळून 'जाव जहन्नममे' अशी म्हणण्याची पाळी (नवऱ्यावर) येते, तसा प्रकार होऊ देणे बरे नाही. भिन्न मार्गाने जावयाचे असेल तर जावे, त्याला मी हरकत करू शकणार नाही, किंवा त्याबद्दल मी काही उदास होऊन मला जे करावयाचे ते बंदही करणार नाही. मात्र भिन्न मार्ग कोणता याचा विचार करून मग तो पत्करावा, मांगांची उन्नति करून त्यांचा स्वाभिमान जागृत करणे, हा या भिन्न मार्गाचा उद्देश असेल तर तो स्तुत्य आहे. पण महारांशी काडीमोड करून, केवळ सनातनी हिंदु किंवा काँग्रेस यांची गुलामगिरी करणे, हाच जर या भिन्न मार्गाचा उद्देश असेल, तर त्यांत काही मांग व्यक्तींचा लाभ होईल, पण त्यात मांग जातीचा अनर्थ आहे, यात मला तरी काही शंका नाही, तरी मर्जीनुसार मार्ग चोखळणे. पत्र बरेच लांबले, पण आपले उत्तर सविस्तर आले पाहिजे, असे फर्माविल्यामुळे संक्षिप्त लिहिता आले नाही.
आपला कृपाभिलाषी,
ता. १३-६-१९४१ (सही) भीमराव रामजी [आंबेडकर” ]