हे सत्य की कावा ? - Page 392

२७
हे सत्य की कावा ?

“वीस वर्षे गांधींच्या तत्त्वाज्ञानात भिजत व मुरत घालूनही कूपलानी हे कोरडेच राहिले काय ? जनतेने आपल्या शांतीप्रधान प्रयत्नाने स्वत: सरकार व्हायचे हे गांधींच्या राजकारणाचे सार आहे. राज्यसत्ता म्हणजे साव्हरेन्टी ही 'सरकारा"त नसून जनतेत असते असे गांधींचे व इंग्लंडातील लिबरलांचे तत्त्वज्ञान आहे. त्या त्या वेळचे सरकार (गव्हर्नमेन्ट) हे या राज्यसत्तेची इच्छा पार पाडणारे यंत्र असते. ज्यावेळी हे 'सरकार' आपले काम करण्यास पूर्ण निरूपयोगी होते त्यावेळी जनतेची इच्छाशक्ती प्रत्यक्ष कृतीने राज्यसंस्थेचे व सरकारचे रूप पालटून टाकते. गांधींनी हेच कार्य टिळकांचे पुढे चालविण्यासाठी धुरीणत्व पत्करले. त्यांचे तंत्र ठरलेले आहे. शेतकरी, कामकरी व मध्यम वर्ग आणि आपल्या सहाय्यास येतील ते सर्व वरिष्ठ वर्ग यांची संघटना करून राज्यसत्ता लोकमतानुवर्ती होईल, असे दडपण सरकारावर आणायचे. गांधीचा हांच मार्ग होता व आहे.

पण जनतेला मूढ ठेवून तिचे कर्तृत्व नष्ट करून टाकावयाचे हे धोरण आज गांधीसह साऱ्या काँग्रेस पुढाऱ्यांनी अवलंबिले आहे. बेजबाबदार व अप्रातिनिधिक गव्हर्नरशाही सोळा कोटी प्रजेवर एक वर्षाहून अधिक काळ नांदते आहे पण लोक तिजवर फिदा आहेत ! इंग्लंडात ही गोष्ट घडली नसती, असे अमेरी स्वतःच्या नव्हे तरी झेटलंडच्या मिशांवर ताव देऊन म्हणाले, तो टोमणा खरा होता. हिंदी जनता आज अहिंसेमुळे अडलेली नाही. तिला मेषपात्र बनविण्यात आले आहे, व याला काँग्रेस पुढारी जबाबदार आहेत. ही जबाबदारी लक्षात घेऊन रस्ता बदलावा त्याऐवजी कृपालानी चमत्काराची वाट पाहात आहेत | चमत्काराची वाट पाहणाऱ्याच्या हाती काय पडते, हे रेनोच्या उदाहरणावरून कळले आहे. आमच्या येथे रेनोच्या इतकी निराशेची परिस्थिती अजून आलेली नाही. वृद्ध पुढाऱ्यांनी हातपाय गाळले असल्यास काँग्रेसमधील तरुणांनी तरी आता स्वतःच्या बळावर पुढे पाऊल टाकले पाहिजे--'

वरील उद्गार वाचून ते जनता पत्राच्या संपादकाने काढले आहेत, असे जर वाचकांस वाटले तर त्यात काही आश्‍चर्यकारक आहे, असे कोणास वाटणार नाही. परंतु ते उद्‌गार जनतेच्या संपादकाचे नसून ते गेल्या रविवारच्या