342 डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
परमेश्वराची प्रार्थना करीत राहणे याच्याशिवाय परचक्र टाळण्याकरिता दुसरा कोणताही मार्ग देशाला उरलेला नाही, हेच जर खरे असेल तर कॉंग्रेसचा काय किंवा कोणत्याही राजकीय संस्थेचा काही उपयोग नाही. आणि सारे राजकारण व्यर्थ आहे, असे म्हणावे लागेल. काँग्रेससारख्या बलवत्तर राजकीय संस्थेची अशी स्थिती व्हावी ही गोष्ट आम्हास देखील शोचनीय वाटते. आम्ही पुष्कळ दिवसापासून सांगत आलो आहोत की जोपर्यंत काँग्रेस ही गांधीच्या आधीन आहे तोपर्यंत काँग्रेसच्या हातून राजकीय क्रांती नव्हे राजकीय प्रगतिसुद्धा होणे शक्य नाही. पुष्कळ लोकांना हे पटत होते. परंतु त्यापैकी काहींचा युक्तिवाद असा असे की, टीकाकारांनी आंत येऊन त्यांना जी काही सुधारणा करावयाची असेल ती त्यांनी करावी. हा युक्तिवाद आम्हास कधीच पटला नाही. फसून सापळ्यात शिरणाऱ्या उंदराला जसे त्यातून बाहेर पडता येत नाही व सापळाही मोडता येत नाही तद्वत बाहेर राहून जे-काँग्रेसवर टीका करतात त्यांना आत जाऊन काँग्रेसची सुधारणाही करता येणार नाही व त्यांना सुखरूप बाहेरही पडता येणार नाही. एकतर गांधी व काँग्रेस याची फारकत झाली पाहिजे नाहीतर काँग्रेसने गांधी तत्त्वाला तिलांजली देऊन व गांधीचे पुढारीपण झुगारून स्वतंत्रपणे आपले जीवन मानवी अनुभवाच्या पायावर रचून कार्य करण्यास सुरवात केली पाहिजे. नाहीतर ज्यांची गांधीपेक्षा देश श्रेष्ठ आहे अशी भावना दृढतर झाली असेल त्यांनी काँग्रेसच्या बाहेर येऊन देशाकरिता आपल्याला जे काही करता येईल ते करावे. ही विचारसरणी लोकमान्यकारांनी आपल्या अग्रलेखात मांडली याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. मांजरीची पिले उपजता त्यांचे डोळे मिटलेले असतात परंतु काही दिवसांनी त्यांचे डोळे उघडून ती सृष्टीचा अनुभव घेण्यास सिद्ध होतात. आमच्या काँग्रेस भक्तांचे डोळे कधी तरी उघडतील अशी आशा आम्हास कधीच नव्हती. परंतु निराशेमध्ये एक आशेचा किरण दिसला याबद्दल आम्हासही मोठे समाधान होते.
वरील विचार प्रदर्शित करतांना आमच्या वाचकांना एका गोष्टीबाबत इशारा देणे हे आम्हास अत्यंत अगत्याचे वाटते. पुष्कळशा लोकांना रा. मुनशी हे काँग्रेसमधुन बाहेर पडल्यामुळे मोठे समाधान झाल्याचे दिसून येते आहे. रा. मुनशी यांनी 'काँग्रेसचा त्याग केला आहे त्याबद्दल आम्हाला समाधान तर वाटत नाहीच नाही; परंतु त्यांच्या वर्तनाबद्दल मोठी शंका उत्पन्न होत आहे. आम्ही समाधान व्यक्त केले ते लोकमान्यासारख्या काँग्रेसला सर्वस्वी वाहून गेलेल्या वृत्तपत्राचे डोळे उघडले याबद्दल ! रा. मुनशी हे काँग्रेसबाहेर पडले, असा सर्वत्र समज पसरलेला दिसून येतो. तसेच त्यांनी ज्या कारणामुळे काँग्रेस