डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ३५४
या सर्व गोष्टींचा विचार करून जर गांधींनी गुजराथी समाजाचा ओघ हिंदू महासभेकडे जाऊं देण्यापेक्षा आपल्याच एखाद्या शिष्याच्या हाती राहील अशा प्रकारचा प्रयत्न करणे या प्रसंगी आवश्यक आहे, असे समजून श्री. मुनशीना मुद्दाम बाहेर सोडले असेल, असे म्हटले असतांना त्यात काही वावगे होईल, असे आम्हास वाटत नाही. गांधी जरी महात्मा झाले तरी सर्वसाधारण मनुष्यमात्राला असलेले विकार-मद, मत्सर, दंभ, अहंकार इत्यादी त्यांना नाहीत असे कोणालाही म्हणता येणार नाही. ज्या गुजराथी समाजाच्या आश्रयावर गांधींनी जी आपली राजकीय इमारत रचली आहे तिचा पाया अशारीतीने ढासळत असलेला पाहून त्यांनी आम्ही म्हणतो त्या हेतूने श्री. मुनशी यांना काँग्रेस बाहेर सोडून देण्याची हेतू-पुरस्पर योजना करणें स्वाभाविक आहे. आम्ही इच्छितो की आमचा अंदाज चुकीचा ठरो. भविष्यांती काय ठरले तेच खरे. परंतु मुनशीच्या काँग्रेस त्यागाबद्दल ज्यांना समाधान वाटते त्यांना या घटनेविषयी आम्हाला जो संशय उत्पन्न होतो तो व्यक्त करून सांगणे, हे आमचे कर्तव्यकर्म आहे.
अग्रलेख : जनता ता. ५ जुलै १९४१.
उद्घृत : गांजरे, खंड ५, पृ. ३७-४१.