बुद्ध व त्याच्या धम्माचे भवितव्य - Page 415

१०६
बुद्ध व त्याच्या धम्माचे भवितव्य

१९५० च्या वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटी ने त्यांच्या 'महाबेधी' ह्या मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा “ Buddha and the future of his Religion " शीर्षकाखाली लेख प्रकाशित केला होता. त्या लेखाचा मराठीत केलेला हा मुक्‍त अनुवाद.

“पृथ्वीतलावर जेवढे म्हणून धर्म संस्थापक होऊन गेले आहेत, त्या सर्वांमध्ये केवळ चौघांनीच भूतकाळ गाजविलेला आहे; एवढेच नव्हे तर वर्तमानकाळ सुद्धा खडबडून जागा केलेला आहे; आणि आपल्या धर्ममतांचा पगडा जनमानसावर कायमचा बसविलेला आहे. बुद्ध, खिस्त, महंमद व कृष्ण हेच ते चार धर्मप्रमुख व धर्मप्रसारक होत. ह्या चौघांच्या व्यक्तिमत्वांची व धर्मप्रसारपद्धतींची तुलनात्मक छानणी केली तर परस्परांत मात्र बराच विरोध आढळून येतो.

आत्मस्तुती व अहंभाव यांच्यापासूनची अलिप्तता हे खास वैशिष्ट्य चौघांमध्ये फक्त तथागत बुद्धाच्याच बाबतीत प्रकर्षाने उठून दिसते. बायबलचे वाचन केले तर त्यात सर्वत्र येशू खिस्ताने स्वतःला परमेश्वराचा खास पुत्र म्हणवून घेतल्याचे व जो कोणी त्याला मानणार नाही अशा व्यक्तीस आकाशातील देवांच्या राज्यात प्रवेश करता येणार नाही असे सांगितल्याचे आढळून येते.

महंमद पैगंबराने खिस्तापेक्षा एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याने स्वतःला अल्लाचा (परमेश्वराचा) प्रेषित किंवा दूत म्हणवून घेतले आहे; आणि तो [सुद्धा ] शेवटचाच. त्याच्यानंतर कोणीही ईश्वराचा प्रेषित असणार नाही किंवा होणार नाही. आणि म्हणून ज्या कोणाला संसारापासून मुक्ती हवी असेल व जन्नत (स्वर्ग) पाहिजे असेल त्याने कोणतीच आशंका न बाळगता महंमद पेगंबरालाच मानले पाहिजे असे त्याने निक्षून सांगितले आहे.

श्रीकृष्णाने तर येशू खिस्त व महंमद पैगंबर ह्या दोघांवरही ताण केली आहे. ईश्वराचा पुत्र किंवा शेवटचा दूत वगैरे असे काही एक न म्हणवून घेता किंवा मी देव आहे असेही न म्हणवून घेता श्रीकृष्णाने स्वतःलाच परमेश्वर म्हणजेच देवाधिदेव (देवांचा देव) म्हणवून घेतले आहे. यास्तव सर्वांनी केवळ त्याचीच पूजा करावयास पाहिजे; त्यालाच भजावयास पाहिजे. म्हणजे सगळ्यांना मुक्ती प्राप्त होऊन स्वर्गलाम होईल असे त्याने सांगितले आहे. |

1 पाहा, परिशिष्ट क्रमांक : २२