बुद्ध व त्याच्या धम्माचे भवितव्य ३७५
मते काळाशी अनुरूप व परिस्थितीशी सुसंगत वाटत नसतील ती मते त्यांना टाकूनही देता येतात. याच कारणामुळे तथागत बुद्धाने बौद्ध धर्म शुष्क, काष्ठ न समजता तो सदाहरित व चिरतरुण मानला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यासाठी त्याने आपल्या अनुयायांना नितांत गरज भासेल तेव्हा बौद्धमते परिवर्तनशील करण्यास पूर्णपणे स्वातंत्र्य प्रदान केलेले आहे. असे स्वातंत्र्य दुसऱ्या कोणत्याच धर्मगुरूने आपल्या अनुयायांना दिलेले नाही, किंवा तसे स्वातंत्र्य देण्याचे धाडसही दाखविलेले नाही. कारण त्यांना भीती वाटली असावी की, अशा मुक्त स्वातंत्र्याने त्यांनी प्रस्थापित केलेल्या धर्ममतांचा डोलाराच नेस्तनाबूत होईल ट त्यांचे नामनिशाण सुद्धा राहणार नाही. परंतु, अशी भीती बुद्धाला कधीही वाटली नाही. त्यांच्या धर्ममतांची इमारतच मुळात भक्कम अशा पायावर आधारलेली होती. जगातील कोणताच वैचारिक झंजावात आपल्या धम्माला जमीनदोस्त करू शकणार नाही, ह्याची बालंबाल खात्री बुद्धाला होती. हेच तथागत बुद्धाच्या अद्वितीय व्यक्तिमत्वाचे निदर्शक होय.
बुद्धाचे असाधारण व्यतिमत्व समजून घेतल्यावर बुद्धाच्या धम्माची विचारसरणी काय होती, बुद्ध तत्त्वज्ञान कसे होते आणि आजच्या प्रस्थापित धर्माच्या तुलनेत बौद्ध धर्माचे काय स्थान आहे हे समजावून घेणे अत्यावश्यक आहे.
भारताच्या संबंधात विचार करताना बौद्धधर्म व हिंदुधर्म यांच्या तुलनेत मोजक्या व प्रमुख बाबींमध्ये फक्त दोनच मुद्यांचा परामर्श घेणे उचित ठरेल. हे दोन मुद म्हणजे धर्मविषयक कर्मकांड व चातुर्वर्ण्यव्यवस्था हे होत.
हिंदू धर्माचा अभ्यास केल्यावर जी बाब प्रकर्षाने जाणवते ती ही की, नीतिमत्ता हिंदू धर्माची आधारशिला नाही. जी काही थोडीफार नीतिमत्ता हिंदू धर्माशी निगडित असलेली आढळते, ती हिंदू धर्माचा अविभाज्य असा घटक नाही. 'धर्म' ह्या प्रचलित शब्दाच्या अर्थामध्येच मूलतः नीतिमत्तेला स्थान नाही. नीतिमत्तेचा संबंध समाज स्वास्थ्याशी निश्चितच लावलेला आहे; परंतु, हिंदू धर्माशी लावला गेलेला नाही. ही अत्यंत आश्चर्यकारक बाब आहे. उलट बौद्ध धर्म हा मूलतःच नीतिमान् धर्म मानला गेला आहे. नीतिमत्ता ही बौद्धधर्माची सर्वप्रथम व प्रमुख अशी आधारशिला मानली गेली आहे. इतर धर्म ईश्वराला धर्माचे प्रमुख व मूलभूत अंग मानतात. परंतु, बौद्ध धर्मात ईश्वराला मुळी स्थानच नाही. ईश्वराचे स्थान बौद्ध धर्मात नीतिमत्तेने पटकावलेले आहे. जे प्राधान्य इतर साऱ्या धर्मांनी ईश्वराला दिले आहे त्याहून काकणभर जास्त प्राधान्य बौद्ध धर्माने नीतिमत्तेला व नीतितत्त्वांना दिलेले आहे.