बुद्ध व त्याच्या धम्माचे भवितव्य - Page 422

३८० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

तर मनुष्याची वर्णांमध्ये विभागणी करण्याची चिरकालीन व स्थायी स्वरुपाची चातुर्वर्ण्य पद्धती किंवा व्यवसाय पद्धती मान्यच होऊ शकत नाही. त्यामुळे भगवद्गीतेची विचारसरणी संपूर्णत: कोलमडून पडते. परंतु ह्या अगोदर मी म्हटल्याप्रमाणे हिंदू धर्मियांना तिच्या सत्याभासामुळे व दर्शनीय चांगलेपणामुळे भुरळ पडलेली आहे, ते तिचे गुलाम झालेले आहेत. परिणामी हिंदू धर्माने चातुर्वर्ण्य पद्धतीचा सतत उदोउदो केलेला आहे आणि असमानतेवर आधारलेल्या जातिसंस्थेला कवटाळून धरलेले आहे. हिंदू धर्माच्या या दोन दुर्गुणांपासून बौद्धधर्म पूर्णतः अलिप्त राहिलेला आहे.

बौद्ध तत्त्वज्ञानच हिंदूंना तारू शकते असे अनेक लोकांना वाटते. परंतु ते काहीसे उदासीन झालेले आहेत. भारतात पुन्हा बौद्ध धर्म मूळ धरू शकणार नाही किंवा त्याचे पुनरुज्जीवन होऊ शकणार नाही असे त्यांना वाटते. परंतु त्यांचा हा निराशावाद मला मान्य नाही. |

हिंदुधर्म मानणाऱ्यांत दोन विचारसरणीचे लोक आहेत. पहिल्या विचारसरणीचे लोक सर्व धर्म खरे आहेत, एवढेच नव्हे तर सारखेच आहेत असा विश्‍वास बाळगणारे आहेत. ह्या विचारसरणीला पाठिंबा देणारे इतर धर्मीय सुद्धा भरपूर आहेत. परंतु सर्व धर्म खरे आहेत किंवा सारखे आहेत असे म्हणण्याइतका मिथ्यावाद दुसरा तरी कोणताच नसेल. दुसऱ्या विचारसरणीचे जे हिंदू आहेत, त्यांन' असे वाटते की, हिंदू धर्मात अनेक भोंगळपणाच्या व मिथ्या गोष्टी आहेत. परंतु हे लोक उघडपणे असल्या गोष्टी मान्य करण्यास किंवा उच्चारण्यास धजत नाहीत. हे असे का व्हावे हे मात्र कळत नाही !

धर्म हा समाजजीवनातील वारसाचा एक भाग असतो. त्याच्याशी मनुष्याचे जीवन, त्याची प्रतिष्ठा, त्याचा स्वाभिमान इत्यादी गोष्टी निगडित असतात. याचमुळे एखाद्याला स्वत:च्या धर्माचा त्याग करणे सहजासहजी शक्य होत नसते. बरोबर असो वा चूक असो माझा देश म्हणण्यात जो एकप्रकारचा स्वाभिमान अंतर्यामी वसत असतो त्याचप्रमाणे बरोबर असो किंवा चूक असो ' माझा धर्म ' म्हणण्यात सुद्धा एक प्रकारचा ज्वलंत स्वाभिमान अंतःकरणात दडलेला असतो. ह्याच कारणास्तव धर्मातील अनिष्ट व अहितकारक बाबींची जाणीव असूनही अनेक हिंदू धर्मीय स्वत:च्या धर्माचा त्याग करण्याचे धारिष्ट्य न दाखविता त्यालाच कवटाळून राहण्यासाठी दुसरे अनेक मार्ग धुंडाळीत असतात. काही लोक स्वत:चे सांत्वन अशा विचाराने करतात की, सर्वच धर्म सदोष आहेत. त्यामुळे हा धर्म वाईट की तो धर्म वाईट असा विचारच मुळी करू नये. काहींना स्वदेश प्रेमाच्या भोंगळ अभिमानाने बौद्धधर्म अत्युत्तम म्हणवून सुद्धा उघड रीतीने स्वीकारण्यास लाज