बुद्ध व त्याच्या धम्माचे भवितव्य - Page 424

३८२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

हिंदुधर्म व बौद्ध धर्म ह्यांच्यात तौलनिक विचार केल्यानंतर इतर धर्मांच्या विचारसरणीत बौद्ध विचारधारा काय आहे, हे आता आपण संक्षेपाने बघू या.

कोणतीही समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी त्या समाजव्यवस्थेस एकतर कायद्याचा किंवा नीतिमत्तेचा आधार घ्यावा लागतो. कायदा आणि नीतिमत्ता ह्या दोहोंपैकी एखादी गोष्ट जरी नसेल तर समाजस्वास्थ अबाधित राहत नाही. कोणत्याही समाजात कायद्यांना फार थोडा वाव दिलेला असतो कारण थोड्या लोकांना सामाजिक शिस्तीत बद्ध करण्यासाठीच कायद्यांची योजना केलेली असते. त्या कायद्यांच्या जोरावर त्यांना योग्यप्रकारे वागायला भाग पाडून समाजस्वास्थ्य टिकवून ठेवता येते. उलट बहुसंख्य लोकांना नीतिमत्तेच्या धाकाने समाजजीवन सुस्थिर ठेवण्यास प्रवृत्त करता येते. ही बाब लक्षात घेतली म्हणजे नीतिमत्तेवर आधारित धर्म समाजजीवन सुस्थिर करण्याचे व समाजस्वास्थ टिकवून ठेवण्याचे प्रमुख तत्त्व आहे हे मानावे लागते.

दुसरी गोष्ट, धर्म हा विज्ञानाशी विसंवादी असून चालत नाही. तो जर विज्ञानाशी विसंगत असेल तर तो लोकादरास पात्र ठरत नाही. तो हास्यास्पद ठरून जीवनविषयक तत्त्वज्ञान रुजविण्यास असमर्थ ठरतो. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास असे म्हणता येईल की, धर्माला जर कार्यप्रवण व्हावयाचे असेल तर त्याचा संबंध कार्यकारणाशी म्हणजेच विज्ञानाशी दृढतर असावयास

पाहिजे. '

तिसरी गोष्ट, सामाजिक नीतिमत्ता ह्या दृष्टीने धर्माला एका विशिष्ट चाचणी परीक्षेत उतरावे लागते. धर्म हा केवळ नीतिबद्ध असून चालत नाही तर त्याला स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या त्रयींच्या चाचणीत उतरावे लागते. ह्या त्रयीशिवाय कोणताही धर्म समाजधारणेस निरर्थकच ठरत असतो.

चवथी गोष्ट, धर्माने. दारिद्र्याचे गोडवे गाऊन त्याचे उदात्तीकरण केलेले केव्हाही बरे नसते. धर्माच्या नावाखाली श्रीमंतांच्या संन्यास वृत्तीचे स्तोम माजविले गेले तर ते एकदाचे मान्य केले जाऊ शकते. परंतु गरिबी ही पूर्वजन्माचे फळ आहे असे म्हणून दारिद्र्याचे स्तोम माजविले गेले तर धर्माचा विपर्यास करणे होते ; अनैतिकता व गुन्हेगारी ह्यांना चिरस्थायी स्वरूप प्राप्त करून देणे होते ; एवढेच नव्हे तर नरकाच्या कल्पनेप्रमाणे एका यातनायुक्त जीवनाला

मान्यता देणे होते.

वरील या सगळ्या कसोट्यांवर कोणता धर्म पुरेपूर उतरू शकतो ? ह्या प्रश्‍नाचा विचार करताना एक गोष्ट स्मरणात ठेवणे आवश्यक आहे. आजच्या काळात ' महात्मा ' अवतरण्याचे दिवस राहिले नाहीत. त्यामुळे एखादा नवीन धर्म उदयास येण्याची तिळमात्र शक्यता राहिलेली नाही. जे धर्म आज पृथ्वीच्या पाठीवर अस्तित्वात आहेत त्या मधूनच योग्य तो धर्म निवडणे व त्याचे अनुयायीत्व पत्करणे भाग आहे.