बुद्ध व त्याच्या धम्माचे भवितव्य ३८३
उपरिनिर्दिष्ट कसोट्यांपैकी केवळ एकाच कसोटीला किंवा दोन कसोट्यांना उतरणारा अस्तित्वात असणाऱ्या धर्मांमधून एखाद दुसरा धर्म आढळतो. परंतु 'प्रश्न असा आहे की, साऱ्याच कसोट्यांना उतरणारा असा कोणता धर्म आहे ? माझ्या माहीती प्रमाणे केवळ बौद्ध धर्मच वरील साऱ्या कसोट्यांना पूर्णपणे उतरू शकतो. बौद्ध धर्म हाच एक असा धर्म आहे की त्याची कास धरणे जगाला आज भाग आहे. आजचे आधुनिक जग प्राचीन जगाच्या मानाने फारच वेगळे आहे. त्यालाच आज धर्माची खरी निकड आहे. आणि ती निकड । भागविण्यासाठी त्याला बुद्धाच्या धर्माचीच निवड करावी लागणार आहे.
माझे हे प्रतिपादन लोकांना पटणार नाही. कारण बहुतेक लोकांनी तथागत बुद्धावर लिहिताना बुद्धाने केवळ अहिंसेचेच प्रतिपादन केलेले आहे ; त्याशिवाय दुसरे कोणतेच उच्च विचार त्याने प्रदर्शित केलेले नाहीत असे सांगितल्याचे आढळते. त्यामुळे बौद्धधर्म आजच्या जगाची निकड भागवू शकणार नाही असे त्यांना वाटण्याचा संभव आहे. परंतु हा विचार दिशाभूल करणारा आहे. बुद्धाने अहिंसा तत्त्वाचे प्रतिपादन केलेले आहे हे सत्य आहे. परंतु त्याचे महत्त्व मी मुळीच कमी लेखीत नाही. कारण अहिंसेचे तत्त्व हे महान तत्त्व आहे. त्याचा अंगिकार केल्याशिवाय जगाचे विध्वंसनापासून तारण करता येणार नाही. बुद्धाने अहिसेव्यतिरिक्त दुसऱ्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत, हे मला प्रामुख्याने म्हणावयाचे आहे. धम्माचा भाग म्हणून बुद्धाने सामाजिक, वैयक्तिक, आर्थिक व राजकीय स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे. त्याने समानता केवळ पुरुषांपुरतीच मर्यादित ठेवली नाही तर ती समानता स्त्री-पुरुषांमध्येसुद्धा पुरस्कारली आहे. बुद्धाने लोकसमाज जीवनातील. नानाविध अंगप्रत्यंगाचा सखोलतेने अभ्यास केलेला आहे. त्याचे तत्त्वज्ञान अत्याधुनिक असून त्याच्या धम्माचा प्रमुख हेतू ऐहिक जीवनात मनुष्याला सुख समाधान प्राप्त करून द्यायचा आहे. परंतु हे समाधान मरणानंतर स्वर्ग नावाच्या न पाहिलेल्या ठिकाणी नव्हे तर ह्याच जगी ह्याच डोळा मिळवून द्यावयाचा आहे. बुद्धाशी तुलना करता येईल असा जगात कोणताच धर्मगुरू मिळणार नाही. बुद्धाचे हे खास वैशिष्ट्य आहे.
बौद्ध धर्माच्या श्रेष्ठत्वाच्या या साऱ्या बाबींचा विचार केल्यावर साहजिकच असा प्रश्न उभा राहतो की, बौद्धधर्म प्रसाराचे स्वप्न कसे साकार करता येईल ? बौद्धधर्म प्रसार साऱ्या विश्वात करून घ्यावयाचा असेल तर पुढील तीन गोष्टींचा गंभीरतेने विचार होणे जरूरीचे आहे. e
पहिली गोष्ट ही की, बौद्धधर्माचा बायबल सदृश प्रमाणभूत असा एकमात्र ग्रंथ तयार करणे, दुसरी- गोष्ट बौद्ध मिक्खू संघाच्या संघटनेत, ध्येयधोरणात व कार्यप्रणालीत आमूलाग्र बदल घडवून आणणे आणि तिसरी गोष्ट ही की,
आंतरराष्ट्रीय बौद्धसेवा संघ स्थापन करणे.