३८४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
बौद्धधर्म प्रसाराच्या दृष्टीकोनातून बौद्धधर्माचा बायबल सारखा एकमेव प्रमाणभूत ग्रंथ निर्माण करणे ही सर्वप्रथम गरज आहे. बौद्ध वाड्मय अत्यंत अफाट आहे. बौद्ध वाङ्मयाच्या अथांग महासागरात एखाद्याने बौद्ध धर्माचे सार समजून घेण्यासाठी कितीही बुड्या मारल्या तरी हे हस्तगत करता येणार नाही. बौद्धधर्माच्या तुलनेत इतर धर्मात मात्र एक मोठी सोय आहे. ती ही की, त्या त्या धर्माचा सारभूत एकमात्र धर्मग्रंथ काखेत घेऊन कुठेही नेता येणारा व कुठेही वाचन करता येऊ शकणारा हाताळण्याजोगा कैलेला आहे. परंतु बौद्धधर्मात असा एकमेव ग्रंथ नसल्यामुळे सर्व साधारण बौद्ध अनुयायांची अत्यंत कुचंबना होते. बौद्ध ग्रंथसंभारातील ' धम्मपद ' हा ग्रंथ ही उणीव काहीशी भरून काढू शकतो. परंतु भारतातील हिंदी भाषेत तयार केलेला धम्मपद हा ग्रंथ ही अपेक्षा पूर्ण करण्यास मात्र थिटा ठरलेला आहे. प्रत्येक धर्म कोणत्या ना कोणत्या श्रद्धेवर आधारित आहे. परंतु ही श्रद्धा पारंपारिक संप्रदायाच्या स्वरुपात आत्मसात केली जाऊ शकत नाही. ह्या श्रद्धेला पुराण, महाकाव्य ह्यासारख्या किंवा साहित्यातील कल्पनाविलासाने सजलेल्या कथावस्तू सारख्या गोष्टींची आवश्यकता असते. भारतीय धम्मपद अशा प्रासादिक भाषेत गुंफले गेलेले नसल्याने ते केवळ शुष्क तत्त्वज्ञानाचीच चर्चा करून श्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न करते.
यास्तव नियोजित बौद्ध धर्माच्या एकमेव ग्रंथात संक्षेपाने बुद्धाचा जीवनपट, चिनी धम्मपद, काही महत्त्वाचे बुद्धाचे संवाद, बौद्ध धर्मीय लोकांच्या जन्म, मृत्यू लग्न इत्यादी सामाजिक विधींची माहीती ह्यांचा समावेश होणे आवश्यक आहे. परंतु अशाप्रकारचा एकमेव धर्मग्रंथ तयार करताना भाषेच्या बाबींकडे दुर्लक्ष केले जाता कामा नये. तो ग्रंथ अशाच जिवंत भाषेत लिहिला जावा की त्या भाषेने माणसाचे हृदय हेलावले जावे व त्याचे मन मंत्रमुग्ध व्हावे. ती भाषा रटाळ, कंटाळवाणी किंवा नुसतीच गंभीर किंवा उगीचच भारदस्त असू नये. ग्रंथाच्या भाषाशैलीत लालित्य असावे, माधुर्य असावे, ती भाषा प्रासादिक, मनमोहक व ओजस्वी असावी. तरच ती लोकाच्या मनावर बिंबू शकेल, ठसू शकेल.
हिंदू संन्यासी व बौद्ध भिक्खू ह्या दोहोंत जमीनअस्मानचा फरक आहे. हिंदू संन्यासाला जनाशी, समाजाशी काही कर्तव्य नसते. तो जगापासून पराङ्मुख झालेला असतो, समाज जीवनापासून दूर पळालेला असतो. त्यामुळे तो जगाच्या दृष्टिकोनातून मृतवत असतो, परंतु बौद्ध भिक्खूचे तसे नाही. त्याचा जगाशी व समाजजीवनाशी घनिष्ट संबंध असतो. तो समाजाशी कर्तव्यबद्ध असतो. भिक्खूला संन्याशासारखा एकटा दुकटा न ठेवता तो संघटनेने राहावा, त्यांचा संघ असावा ह्याचा हेतू तरी काय ?