हिंदु स्त्रियांची उन्नति आणि अवनति, याला जबाबदार कोण ? - Page 433

हिंदु स्त्रियांची उन्नति आणि अवनती ..... जबाबदार कोण ? ३९१

त्यामुळे नंतरच्या काळात भिक्खूंनी हा उतारा प्रक्षिप्त केला या विधानात फार

अतिशयोक्ती नाही. पहिली गोष्ट ही की सुत्तपिटक लिहिंण्याकरिता बुद्धाच्या

मृत्यूनंतर चारशे वर्षांचा काळ लोटला होता. दुसरे असे की ज्या संपादकांनी

त्याचे संकलन आणि संपादन केले ते भिक्खू होते आणि त्यांनी भिक्खूसाठीच

त्यांचे संकलन आणि संपादन केले होते. ' ब्रह्मचर्याचा नियम सुरक्षित

ठेवण्याच्या उद्देशाने असे विधान बुद्धासंबंधी करणे भिक्खूला महत्त्वाचे वाटले

आणि अशा परिस्थितीत भिक्खू संपादकांनी असे लिहिणे असंभवनीय वाटत

नाही.

प्रस्तुत उतारा नंतरच्या काळात प्रक्षिप्त केला या विधानाच्या पुष्टयर्थ अन्य

दोन बाबी सहाय्यभूत ठरतात.

(१) पहिली, प्रस्तुत सुत्ताला दिलेल्या प्रस्तावनेच्या तक्त्यावरुन

(डेव्हिड्सच्या एस. बी, बी. मालिकेतील दीघ निकाय भाग ॥ च्या पृष्ठ ७२

चर पाहायला मिळेल.) असे निदर्शनास येते की, या सुत्तातील बराचसा

भाग इतर सुत्तातही आढळून येतो. परंतु प्रस्तुत उतारा दुसऱ्या कोणत्याही

सुत्तात आढळत नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तथापि या सुत्तातील

बऱ्याच 'उताऱ्यांचा इतर सुत्तात समावेश आहे, ही वास्तविकता आहे.

(२) दुसरे, या सुत्ताचे चिनी भाषांतर अस्तित्त्वात असल्याचे या सुत्ताच्या

प्रस्तावनेतील TS XXXVII वरुन (डेव्हिड्सच्या एस. बी. बी. च्या खंड %। मध्ये

प्रकाशित) निदर्शनास येते. परंतु या चिनी भाषेतील ग्रंथात सुद्धा वरील

विशिष्ट उताऱ्याचा समावेश आढळून येत नाही.

आपण याला सत्याच्या कसोटीवर तपासून पाहू, आनंदाने असा प्रश्न

विचारण्याचे काही विशिष्ट प्रयोजन होते काय? बुद्धाचे स्त्रियांशी

सर्वश्रुत असलेले संबंध लक्षात घेऊन हा प्रश्न होता काय ? खरे तर

आनंदाने असा प्रश्न विचारण्याची शक्यता नाही आणि जर आनंदाने असा

प्रश्‍न विचारलाच असता तर, बुद्धाने असे उत्तर दिले नसते, हे पुराव्यानिशी

सांगता येते. आनंद तसेच भगवान बुद्ध यांची पिटकामध्ये नमूद

असलेली स्त्रियांप्रती वागणूक आणि त्यासंबंधी निर्माण केलेला प्रश्न व

दिलेले उत्तर हे दोन्हीही अगदी विसंगत आहेत.

आनंदाने असा प्रश्न विचारणे खरोखरच गरजेचे होते काय, या मुद्यावर हे नमूद करणे प्रसंगोचित होईल की, महापरिनिब्बाण सुत्ताच्या त्याच प्रकरणात, वर ज्याचा उल्लेख आला आहे, त्यातील फक्त काही गाथा वगळल्या आहेत. आनंदाची वर्तणूक किती आल्हाददायी होती आणि तो सर्वाचा कसा आवडता होता याचे बुद्धाने वर्णन केले आहे. त्यातील दोन गाथा मी खाली नमूद करतो :--