हिंदु स्त्रियांची उन्नति आणि अवनति, याला जबाबदार कोण ? - Page 437

हिंदु स्त्रियांची उन्नति आणि अवनती ..... जबाबदार कोण? ३९५

भिक्खुणी संघाला त्यांनी दुय्यम स्थान दिले या आरोपांचा बुद्धाचे विरोधक आधार

घेतात. आणि हेच दुसरे संभाव्य कारण असू शकते.

येथे पुन्हा या परिस्थितीचे विश्लेषण करणे गरजेचे आहे. महाप्रजापतीच्या

परिव्रज्या घेण्याच्या मागणीला बुद्धाने विरोध का केला? स्त्रियां ह्या निम्न

वर्गाच्या आहेत, ज्यांच्या प्रवेशामुळे भिक्खू संघाचा दर्जा जनमानसात कमी होईल

असा बुद्धाचा समज होता म्हणून त्यांनी यास विरोध केला होता काय? किंवा

स्त्रियां बुद्धाचे तत्त्वज्ञान आणि शिकवण प्रत्यक्षात आणण्याकरिता बौद्धिक आणि

नेतिक दृष्ट्या असमर्थ आहेत अशा मताचे ते होते म्हणून त्यांनी याला विरोध केला

काय ? चर्चेच्या दरम्यान याविषयी बुद्धाची काहीशी कठोर भूमिका बघता

या दोन प्रश्नांपैकी दुसरा प्रश्न बुद्धाला निश्चितपणे आनंदाने विचारला होता

इतकेच नव्हे तर शंकेला किंवा वादाला कोणत्याही प्रकारचा वाव राहू नये म्हणून

बुद्धाने निःसंदिग्धपणे त्याचे उत्तर दिले. त्यांनी सांगितले की त्यांचे तत्त्वज्ञान

आणि शिकवण समजून घेण्यास स्त्रियां पूर्णत: समर्थ असून त्यांच्या परिव्रज्या घेण्याच्या मागणीला विरोध असण्याचे हे कारण नाही. यावरुन हे स्पष्ट होते की पुरुषाच्या तुलनेत स्त्री बौद्धिक किंवा चारित्र्याच्या दृष्टीने कमी दर्जाची आहे अशी बुद्धाची भूमिका नव्हती. त्यांचा दर्जा कमी असल्याने त्या संघाच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील या भीतीतून त्यांच्या प्रवेशाला त्यांनी विरोध केला या युक्तिवादात काहीही अर्थ नाही. असेच जर त्यांचे मत असते तर त्यांनी कधीही त्यांना संघात प्रवेश दिला नसता.

भिक्खू संघाच्या तुलनेत भिक्खूणी संघाला त्यांनी दुय्यम स्थान दिले या युक्तिवादाचे उत्तर असे की, या व्यवस्थेमागे श्रेष्ठपणा किंवा कनिष्ठपणाचा कोणताही विचार नसून, ही भूमिका पूर्णतः व्यावहारिक होती. स्त्रियांना परिव्राजीका म्हणून प्रवेश देताना बुद्धाला दोन प्रश्नांना सामोरे जावे लागले. स्त्री आणि पुरुषांसाठी एकच संघ असावा काय ? यावर त्यांनी दोन स्वतंत्र संघ असावे असा निर्णय घेतला. पुरुष आणि स्त्री परिव्राजकांना जर एकत्र ठेवले तर ब्रह्मचर्याचा नियम पूर्णत: लयास जाईल अशी त्यांना भीती वाटत होती आणि म्हणून स्त्रियांना प्रवेश देण्याबाबत आपण आपल्या मताचा उपयोग करावा असे त्यांना वाटले आणि पुरूषांचे व स्त्रियांचे दोन स्वतंत्र संघ असावेत तसेच त्या दोन संघाच्या दरम्यान गतिरोधक असावे अशी त्यांनी भूमिका घेतली. दोन स्वतंत्र संघ निर्माण करण्याचा निर्णय घेतल्यावर, त्यांना दुसऱ्या एका प्रश्नाला सामोरे जावे लागले. तो म्हणजे एक पुरुषांचा आणि एक स्त्रियांचा असे जर दोन स्वतंत्र संघ असतील तर ते पूर्णत: स्वतंत्र आणि एक दुसऱ्यापासून वेगळे संघ असावेत की त्या दोहोंमध्ये काहीसे परस्पर आंतरसंबंध असावेत ?