४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
पक्षाचे मताधिक्य होऊन या लोकांनीं संपूर्ण स्वातंत्र्यावरील आपला विश्वास लोकनिदर्शनास आणला. परवां कलकत्ता येथें भरलेल्या सर्व पक्षीय परिषदेचे हेंच ध्येय मान्य करून नेहरू रिपोर्टांत अंतर्भूत करावें अशी सूचनाही त्यांनी पाठविली होती. सर्व पक्षीय परिषदेतील बहुमत मात्र वसाहतिक स्वराज्याच्या बाजूचे होतें. पण काँग्रेसमध्ये या लोकांनीं मोठाच गडबडगुंडा माजविल्यामुळे त्यांचे म्हणणे. पंडित मोतीलाल प्रभृती वसाहतिक स्वराज्याच्या पुरस्कर्त्यांना विचारांत घ्यावें लागलेंसें दिसतें. कदाचित या लोकाचे पाठबळ नाहीसे झाल्यास पार्लमेंटवर नेहरू रिपोर्टचा बोजा पडणार नाहीं अशीही भीति त्यांना वाटली असेल म्हणून त्यांनीं वसाहतिक-स्वराज्यपक्ष वं संपूर्ण स्वातंत्र्यवादी पक्ष यांना एकत्र ठेवण्याची एक टुम काढली. म. गांधी यांचा जो तडजोडीचा ठराव कॉँगेसनें मान्य केला, तो याच स्वरूपाचा आहे. १९३० सालच्या डिसेंबरच्या आंत पार्लमेंटनें वसाइतिक स्वराज्य मान्य करावें; तसें न झाल्यास मग असहकारितेची व करबंदीची चळवळ सुरू करण्यांत यावी असा या ठरावाचा आशय आहे. या पोकळ धमकींत कांहीं अर्थ नाहीं हें म. गांधी जाणूनच असतील. अनुभवाने त्यांना तो धडा शिकविला आहेच. पण श्रीनिवास अय्यंगार प्रभृती संपूर्ण स्वातंत्र्याच्या आघाडीवरच्या चौघड्यांची तोंडें तात्पुरती बंद पाडण्यासाठी त्यांनीं ही युक्ती केली असावी हें उघड आहे.
प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. ४ जानेदारी १९२९.