सामाजिक परिषद - Page 47

3
सामाजिक परिषद

या राजकारणापासून समाजकारणाकडे वळतांना सहारा वाळवंट सोडून एकाद्या हिरवळींत प्रवेश केल्याचा भास होतो. हल्लीचें राजकारण हा शुद्ध पोरखेळ होऊन बसला आहे, हें काँग्रेस, सर्व पक्षीय परिषद वगैरेंच्या हकिकली पाहिल्यास कोणासही कळून येईल. आणि याचें कारणही उघड आहे. . हल्लींच्या राजकारणी लोकांत खराखुरा पुढारी असा कोणीच दिसत नाहीं. त्यामुळे सगळेच पुढारी, अशी स्थिति झाली आहे. या सर्व भूतांना ताब्यांत ठेऊन त्यांच्या कडून इच्छित काम करून घेणारा पंचाक्षरी हल्ली कोणीच नाहीं. त्यामुळें ही भूतें मोकाट सुटून त्यांनी राजकारणांत सांवळा गोंधळ घातला आहे.

पण सामाजिक चळवळीची परिस्थिति निराशाजनक असली तरी इतकी निराशाजनक नाहीं. उपमा द्यायची असल्यास असें म्हणतां येईल कीं राजकीय चळवळ अजीर्ण होऊन मरत आहे तर सामाजिक चळवळ, मरत असली तर, भुकेमुळें मरत आहे. वास्तविक ती मरत नाहीं. तिला मारण्याचें अनेक प्रयत्न झाले व आजही होत आहेत. टिळक-चिपळुणकरापासून तो परवां काशीला जमलेल्या ब्राह्मणांपर्यंत या प्रयत्नांची परंपरायेऊन पोंचते. टिळक-चिपळुणकरांनी सामाजिक सुधारणेची चळवळ मारण्यासाठी कसेकसे प्रयत्न केले ते महाराष्ट्राच्या इतिहासात नमूद आहे. त्यांच्या घंटाबडव्यांनीं हिंदूसंघटनाच्या नांवाखाली सामाजिक अंतःशुद्धीच्या चळवळीला गुदमरण्याचीं कसकशी कारस्थाने चालवलीं आहेत तें सर्वांना माहित आहे. काशीच्या ब्राह्मणसंमेलनानें * समाजसुधारणेच्या मुळावरच कुऱ्हाड कशी घातली हेही सर्वांना विदीत झालें आहे. हे प्रयत्न निराळ्या वेळीं, निराळ्या स्थळीं व निराळ्या लोकांकडून झाले. पण सुधारणेची हिंसा हें त्यांचें एकच ध्येय आहे. पण सुधारणेची चळवळ या सर्व प्रयत्नांना पुरून उरली आहे. तिच्या सैन्यांत, तिच्या विरोधकांच्या अपेक्षेबाहेर रिक्रुटभरती होत आहे. समाजसुधारणेशिवाय राजकीय चळवळीचीही धडगत नाहीं हें आतां सर्वांना Ve लागलें आहे.

* : पाहा परिशिष्ट क्र. ४६, खंड-१९.