हिंदु समाजातील वर्गा-वर्गातील उच्च-नीच भेद व लिगभेद कायम ठेवून कोणतेही सुधारण्याचे कायदे म्हणजे घाणं न काढता त्यावरच उभारलेले पत्त्यांचे बंगले ! - Page 462

४२० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

हिंदु कोड बिला बाबतींत माझा छळ झाला म्हटलें तर अतिशयोक्ति व्हावयाची नाहीं. राज्यकर्त्या पक्षाचें बळ मला मंत्रिमंडळांत नव्हतें, पंतप्रधानांनी या बिलावर खुल्या मतदानाची मुभा काँग्रेस पक्षाला दिली होती. ही एक अनपेक्षित गोष्ट होती व पक्षाच्या इतिहासांत नवीन प्रथा होती. निदान पार्लमेन्टमधील पक्ष पुढारी (whip) तरीं भाषणांवर वेळेंचे निर्बध घालील अशी अपेक्षा होती. निदान आवश्यक ती चर्चा झाल्यावर वादविवाद बंद करण्याची सूचना प्रमुख पक्ष पुढारी आणील अशी त्याला सूचना दिली जाईल अशी माझी कल्पना होती. अशा निर्बधामुळें बिल वेळांत पास होऊ शकले असते. पण अशी सूचना कधी दिली गेली नाहीं. पार्लमेन्टच्या कामाचे मिनिस्टर व सरकारींपक्षाचे प्रतोद याच्या बद्दल कमी सांगितलेलें बरें. हिंदु कोड बिलाचें ते द्वेष्टे होते | ते पक्के विरोधी होते. त्यांनी सदरील बिल चर्चेस आले असतांना हजर राहून शिष्टाचाराप्रमाणें मला चर्चा बंद करण्यास मदत करण्याचें पद्धतशीर टाळलें. एका एका कलमावर निरर्थक शब्दाचा कीस पडू लागला आणि हें असे कित्येक दिवस चाललें. सरकारी प्रतोदाचें काम सरकारी वेळ वांचविण्यांचें असतें आणि सरकार-बिले व इतर कामें झपाट्याने पार्लमेन्टांत पार कशी पडतील त्यावर त्यांना कटाक्ष ठेवायचा असतो. पण या प्रतोदानीं शिस्तींत माघार घेतली. पंतप्रधानाशीं एकनिष्ठ न राहणारा प्रतोद व अशा प्रतोदाशीं एकनिष्ठ राहणारा पंतप्रधान; असा प्रकार माझ्या पाहण्यांत कधीं कुठें आला नाहीं | शिस्तभंग करणारा व घटनेनुसार न चालणारा हा प्रतोद पंतप्रधानाच्या गळ्यांतील ताईत आहे ! त्याच्या या बेशिस्त वर्तनाची दखल न घेतां त्याला पक्षाच्या संघटनेत बढती मिळाली आहे. अशा परिस्थितींत काम करणें केव्हांही अशक्यच.

हिंदु कोड बिलाविरूद्ध बहुमत होतें असें बोललें जातें. पण असे विरोधक कितीं होते ? ह्या बिलावर पार्लमेन्टरी काँग्रेस पक्षांत अनेकदां चर्चा झाली आणि मतदान घेतांना प्रत्येकवेळी विरोधक कोलमडून पडले. सरते शेवटी तें विचारांत घेण्यांत आलें तेव्हां पक्षाच्या एकशेंवीस सभासदांपैकी फक्त वीसच विरुद्ध गेले. या पक्षामध्यें तें चर्चेस निघांलें तेव्हां त्यांतील चवेचाळीस कलमें अवघ्या साडेतीन तासांत मंजूर झालीं. ह्यावरून सत्ताधारी पक्षांत किती विरोध होता याची कल्पना येईल | |

खुद्द पार्लमेन्ट मध्यें सुद्धां दोन तीन व चार कलमांवर मत विभागणी झाली. . प्रत्येकवेळी ते प्रचंड मतानें पास झालें. हिंदु कोड बिलाचा आत्मा तें aad कलमहि मंजूर झालें.