रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया . . - Page 481

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ४३९

कार्यकारिणीने केलेल्या ठरावांत, नवा भारतीय रिपब्लिकन पक्ष काढण्याबाबतचा ठराव ; राज्य पुनर्रचनेच्या प्रश्‍नाबाबतचा ठराव सध्याच्या भारतीय परराष्ट्रीय धोरणासंबंधीचा ठराव व सुएझ कालव्यासंबंधाचा ठराव, असें चालू महत्त्वाच्या विषयांवर ठराव पास करण्यांत आले.

रिपब्लिकन पक्ष स्थापन होणार

नवा भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याबाबतच्या ठरावांत कार्यकारिणीने नमूद केले आहे की, आगामी सार्वत्रिक निवडणुकीपुरतीच काँग्रेस पक्षास विरोधी अशी एकच संयुक्त आघाडी निर्माण करण्याची राजकीय वेळ आलेली आहे, एवढेंच नव्हे तर भारतांतील, काँग्रेस-विरोधी मतदारांस, एका संघटनेमध्ये आणून असें संघटन एका राजकीय पक्षाद्वारा निर्माण करण्याची आवश्यकता सध्याच्या राजकीय परिस्थितीप्रमाणे आवश्यक आहे. मानलेल्या अस्पृश्य जाती, वन्य जाती व इतर मागासलेला समाज हे समान अन्त:ःकरणाचे घटक आहेत, त्यांच्या परिषदा, आगामी सार्वत्रिक निवडणुकापूर्वी व तद्नंतरही घ्याव्यात, असा आदेशही कार्यकारिणीनें ठरावांत दिला आहे. या परिषदेद्वारा, नवा भारतीय रिपब्लिकन पक्ष काढण्याचें कार्य करण्यात येईल." १

' रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ' या नवीन पक्षाची मुहूर्तमेढ रोवण्याच्या दृष्टिकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राजकारणातील समविचारी काही प्रमुख व्यक्तिशी बोलणी केली होती आणि त्यांच्याशी पत्रव्यवहार सुरू ठेवला होता. त्यात प्रमुख सोशियालिस्ट पार्टीचे प्रमुख डॉ. राममनोहर लोहिया होते. याबाबत डॉ. राममनोहर लोहिया यांचा, त्यांचे कार्यकर्ते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहारात ' रिपब्लिकन पार्टी ' चा स्पष्ट उल्लेख आहे.

रिपब्लिकन पार्टीचा पाया कोणत्या विचारधारेवर आधारित राहील याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक निवेदन भारतीय जनतेसाठी तयार केले होते. या निवेदनाला ' रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ', भारताच्या लोकसत्ताक पक्षास भारतीय लोकांनी पाठिंबा द्यावा म्हणून त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले खुले पत्र म्हणून संबोधल्या गेले आहे.

१ : प्रबुद्ध भारत, ता. ६ ऑक्टोबर १९५६.

T पाहा परिशिष्ट क्रमांक-२६.