४४२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे.
भारतीय जनतेला प्रकट पत्र
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
(भारतीय लोकसत्ताक पक्ष)
या पक्षांत सामील होण्याबद्दल आवाहन
[परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नवीन पक्षाची मुहुर्तमेढ रोवण्याचें निश्चित केलें होते. भारतीय राजकारणांतील कांहीं प्रमुख्य व्यक्तींशीं त्यांनी त्याबाबत बोलणीहि BS केली होती. भारतीय जनतेला लोळशाहीची संपूर्ण जाणीव देणारे, लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची किती आवश्यकता आहे याचें दिग्दर्शन करणारे, रिपब्लिकन पार्टी कां स्थापली जात. आहे याची कल्पना देणारे, या नव्या पक्षाचें ध्येयधोरण विशद करणारें सविस्तर पत्र त्यांनीं त्यांच्या हयातींत लिहून ठेवले होते. “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' या नूतन पक्षाला पाठिंबा देण्याबद्दल आवाहन करणारें, भारतीय जनतेला लिहिलेलें असें हें बाबांचे प्रकट पत्र आहे. ते हयात असते तर त्यांनी यावरून हात फिरविला असता, तें परिपूर्ण व्हावें म्हणून त्यांनीं कदाचित :कांही फेरबदलहि केलें असते, त्यांत भर घातली असती. मध्येंच त्यांचें महानिर्वाण झाल्यानें हें होऊ शकलें नाहीं. उपलब्ध असलेलें त्यांचें पत्र जसेच्या तसें छापणें इष्ट असल्यानें मी स्वतः अक्षरशः भाषांतर करून येथें छापलें आहे. मूळ लिखाण इंग्रजीत आहे.--दा ता. रुपवते]
[१] चळवळीला राजकीय पक्षाचे स्वरूप कसें प्राप्त होतें
हिंदी काँग्रेसची स्थापना १८८५ सालीं झाली. १९४७ पर्यंत स्वराज्य प्राप्तीची चळवळ म्हणून तिनें काम केलें. सुरवातीला तिला स्पष्ट असें ध्येय नव्हतें. प्रथम तिनें सुराज्याची (चांगल्या राज्यकारभाराची) मागणी केली. त्यानंतर तिनें हें ध्येय बदलले, आणि ' स्वराज्या ' ची मागणी -पुढें ठेवली. ब्रिटीश राजकीय वर्तुळांत ह्या स्वराज्याच्या कल्पनेचें दोन पर्यायी अर्थ करण्यांत आले; (१) वसाहतीचे स्वराज्य (Dominion Status) व (२) संपूर्ण स्वातंत्र्य (Independence) समान (एकाच) राजाला राजनिष्ठ राहून उपभोगावयाचें स्वातंत्र्य म्हणजे वसाहतीचें स्वराज्य होय. तर संपूर्ण स्वराज्याचा अर्थ राजनिष्ठाविरहित स्वातंत्र्य असा होता.