रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ४४७
खालच्या वर्गामधील अंतर दुणावेल, तें (अंतर) लोकशाहीच्या नाशास व भलत्याच एखाद्या राज्यपद्धतीला जन्म देण्यास कारणीभूत होईल. आणि म्हणूनच मी असें नि:संकोचपणे म्हणतो कीं जगातील निरनिराळ्या भागातील लोकशाहीच्या इतिहासाचा अभ्यास केल्यास, लोकशाहीच्या अपयशांचें कारण सामाजिक विषमता, वर्गावर्गात उभी असलेली असमतेची दरी हेंच आहे असें दिसून येईल.
(२) लोकशाहीच्या यश सिद्धीसाठी आवश्यक असलेली दुसरी गोष्ट म्हणजे विरोघी पक्षाचे अस्तित्व ! याबाबतीत पक्ष पद्धती (Party System) विरूद्ध बोलणारे पुष्कळ लोक याच देशांत नव्हे तर इंग्लंडमध्यें देखील मी खूप पाहिले आहेत. इंग्लंडमध्ये पार्टी सिस्टिमवर (पक्ष पद्धतीवर) हेन्सार्ड सोसायटीने लिहिलेल्या ग्रंथांत एक संबंध प्रकरणच्या प्रकरण लिहिलें आहे आणि त्यात, पक्ष पद्धती ही चांगली पद्धती आहे कीं नाहीं आणि तीं राबवायची कीं नाहीं असा प्रश्न उपस्थित करून त्याचा उहापोह केला आहे. या प्रश्नांबाबत पुष्कळ दृष्टीकोन मांडले जातात. माझ्या मतें, जे लोक ' पक्ष पद्धती ' विरूद्ध आहेत आणि अनुषंगानेच ज्यांना विरोधी पक्षाची आवश्यकता वाटत नाहीं, त्यांना ' लोकशाही ' या चीजेचें संपूर्ण आकलन झालेलें नसावें. लोकशाही म्हणजे काय ? मी कांही तिची व्याख्या येथें सांगत नाहीं, तर तिची कार्य-मिमांसा करतो आहे. या अर्थाने लोकशाहीला ' सत्तेवरील नियंत्रण ' (Veto of Power) असें
म्हणतां येईल. “वंश परंपरागत सत्ता ' व सरंजामदारशाही (सनातनशाही) यांच्या नेमक' उलट अर्थाचा शद्ग म्हणजे लोकशाही. लोकशाहीचा अर्थच हा कीं, सत्तारूढ मंडळीच्या अमर्याद सत्तेला कोठें तरी केलेलें नियंत्रण. झोटिंगशाहीमध्यें नियंत्रणाला वावच नसतो. एकदां निवडलेला राजा आपल्या ' उपजत व दैवी ' अधिकाराने राज्य करतो. दर पांच वर्षांनीं त्याला आपल्या प्रजेकडे जाऊन असें म्हणावें लागत नाहीं कीं, “ कांहों, मी चांगला माणूस आहे ना ? गेल्या पांच वर्षातील माझा कारभार तुम्हांला पसंत आहे कीं नाहीं ? पसंत असेल, तर मला पुन्हां राजा म्हणून निवडाल ना ? “ राजाच्या सत्तेवर कोणाचेंहि नियंत्रण नसतें. परंतु लोकशाहीत आपण अशी व्यवस्था केलेली असतें कीं ज्यामुळे सत्तारूढ असलेल्या मंडळीला दर पांच वर्षांनीं लोकांपुढे जावें लागतें; आणि ते सत्तास्थानीं रहावयास लायक आहेत कीं नाहीं, लोकांचा सांभाळ आणि संरक्षण करण्यास समर्थ आहेत कीं नाहीं या प्रश्नावर त्यांना लोकांचा कौल घ्यावा लागतो. यालाच मी सत्तेवरील नियत्रंण (Veto) म्हणतो. परंतु दर पांच वर्षांनीं फक्त एकदां लोकमताचा कौल घेण्याच्या आधी मधल्या काळांत अनियंत्रित सत्ता वापरण्याच्या ह्या ' पंचवंषिक ' नियंत्रणामुळे खरीखुरी लोकशाही येत नाहीं.