अस्पृश्य की पूवांस्पृश्य - Page 51

अस्पृश्य की पूर्वास्पृश्य

कोंकण प्रांतिक बहिष्कृत शिक्षण परिषद लवकरच भरणार आहे. या बाबतींत आमचेकडे आलेलें जाहिर पत्रक † आम्हीं दुसरीकडे छापलें आहे. या पत्रकांत बहिष्कृत अगर अस्पृश्य शब्द न वापरता पूर्वास्पृश्य हा शब्द योजला आहे. ही टूम कोणी काढली हें आम्हांला नक्की माहीत नाहीं. पण ती कोणातरी स्पृश्य वर्गीय हिंदूच्या डोक्यांतून निघाली असावी असा आमचा तर्क आहे. तिचा हेतु जाणणें कठीण नाही. तू गुलाम आहेस असें स्पष्ट शब्दांत गुलामाला सांगितले म्हणजे तो गुलामगिरी विरूद्ध बंड करतो. पण तु गुलाम होतास, आतां नाहींस, असें म्हटलें कीं त्यांच्या मनांतील बंडाचा आवेश पुष्कळ कमी होतो. हें जाणूनच अस्पृश्यवर्गाला कायम गुलामगिरीत ठेवू इच्छिणाऱ्या स्पृश्य हिंदूनीं ही गोडबोली टूम काढली असली पाहिजे. अस्पृश्यवर्गानें या बाबतींत जाणलें पाहिजे तें हैं कीं आपली अस्पृश्यता ही अद्याप भूतकालीन बाब झाली नाहीं, आपण अद्याप अस्पृश्यच आहों, व या अस्पृश्यतेविरूद्ध आपल्याला झगडायचें आहे व तें स्पृश्यवर्गाशीं झगडायचें आहे. यापासून आपल्याला परावृत्त करण्यासाठीं डोकेबाज स्पृश्य लोक वाटेल त्या युक्त्या योजतील. तुम्हीं हल्लीं अस्पृश्य नाहींत असें सांगतील अगर तुम्हांला अस्पृश्य म्हणणें आमच्या ज़ीवावर येतें म्हणून आम्हीं तुम्हाला पूर्वास्पृश्य म्हणतो असाही बहाणा करतील. या युक्त्यांनीं अस्पृश्यवर्गानें gaai उपयोगी नाहीं. आपल्या रोगाचा स्पष्ट उल्लेख करण्यांत कोणाला लाज कां वाटावी ?

+ : पाहा, परिशिष्ट क्र. २.

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. ४ जानेवारी [१९२९. ]