परिशिष्टे - | ४८५
देवदर्शन घेण्याचा व देवाची उपासना करण्याचा जो त्यांना हक्क आहे तोहि
त्यांच्यापासून हिरावून घ्यावयाचा? ' “देवालय' असें म्हणावयाचे आणि फक्त
मोजक्या लोकांना मात्र तेथें जाऊं द्यावयाचें याचा अर्थ काय? देव फक्त
थोड्याशा सुखवस्तु लोकांचाच आहे काय? देव सर्वाचा आहे. त्याला गरीब,
श्रीमंत, विद्वान्, अविद्वान् उच्च नीच सर्व सारखे | इतकेंच नव्हे तर देवाची
आवश्यकता श्रीमंतांपेक्षा गरिबांना, विद्वानांपेक्षा अविद्वानांना व उच्चवर्गीयांपेक्ष
निकृष्टवर्गीयांनाच अधिक आहे. आईचा ओढा शहाण्या सुरत्या निरोगी मुलापेक्षा
निर्बुद्ध व रोगी मुलाकडेच अधिक प्रमाणानें असत नाहीं काय?
सार्थ “देवालये ”
देवालबें जर खरोखर देवालयें-परमेश्वराची वसतिस्थानें झालीं पाहिजेत तर. त्यांचा मूळ उद्देश सफल झाला पाहिजे, स्वतःचे आकुंचित विचार देवावर लादून आम्ही जगांतील इतर देशांच्या उपहासाचे विषय झालों आहोंत. आमचें आत्मिक ध्येय व त्यांतला उदारमतवाद हीं देवालयांमध्ये प्रतिबिंबित झालीं पाहिजेत. नाहीपेक्षां आमचा ढोंगीपणा मात्र त्यांत प्रतिबिंबित होईल आणि स्वाभाविकपणेच दुसरे लोक आमची थट्टा करितील.
आमच्या देवांलयांमध्यें अस्पृश्य मानलेल्या लोकांना जाण्यास पूर्ण मोकळीक ठेवणें म्हणजे आईपासून जबरीने काढून घेतलेल्या लहान मुलांना पुनः तिची भेट करून देणें आहे, तिच्या हृदयापाशी त्यांना जाँउ देणे आहे. परमेश्वर आम्हां सर्वाची माता आहे. या मातेच्या दुर्बल बालकांना आम्ही तिच्यापासून दूर करून तिच्या हृदयाला भयंकर वेदना केल्या आहेत,. हें आपण विसरतां कामा नये.
असें बोलून हा 'दत्तदरबार' सर्व हिंदू स्त्रीपुरुषांना आजपासून मुक्तद्वार आहे असे मी जाहीर करतों. याउपर या दरबारांत सर्व हिंदुधर्मीय लोक भेदाभेद न बाळगतां एकत्र बसतील आणि येथें नारायणाच्या कृपादृष्टीखालीं त्यांचीं सर्व बालके त्याच्याशीं तादात्म्य करून संसारांतला. विविध ताप सहन करण्यास लागणारी प्रेरणा व आत्मिक ज्ञान संपादन करितील. आजचे हें पुण्यकृत्य ज्यांनी घडवून आणलें त्या सर्वाचे मी अभिनंदन करितों. त्यांना परमेश्वराचा आर्शीवाद मिळो आणि या पुण्यमार्गावर पुढें पुढें जाण्यास परमेश्वर त्यांचा सांगाती होवो !
|
बहिष्कृत भारत, ता. ६ सप्टेंबर १९२९.