नेहरू कमिटीची योजना व हिंदुस्थानचे भवितव्य - Page 56

१४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

हल्लींच्या राज्यपद्धतींत तीन प्रकारचे मतदारसंघ अस्तित्वात असल्याचें आढळून येते. कांही मतदारसंघ नुसतेच स्थलवाचक आहेत. कांही स्थलवाचक असून जातिवाचक आहेत. कांही नुसतेच जातिवाचक आहेत. बाकी वर्गवाचक आहेत. स्थलवाचक-जातिवाचक संघ मागासलेल्या हिंदूंकरिता निर्माण करण्यांत आलेले आहेत. त्यांत सर्व जातींच्या मतदारांचा संमिश्रित असा संघ असला तरी मागासलेल्या जातींचे प्रतिनिधी निश्चितपणे निवडून यावे म्हणून कांही जागा राखीव म्हणूनं ठरविण्यांत आलेल्या आहेत. स्वतंत्र जातिवाचक संघ हे मुसलमानांकरितां प्रस्थापित करण्यांत आलेले आहेत. व वर्गवाचक संघ हे व्यापारी, उदमी, व इनामदार, वगैरे वर्गाकरिता योजिलेले आहेत. हल्ली अस्तित्वांत असलेल्या मतदार संघांसंबंधी दोन पक्ष उपस्थित झालेले आहेत. एका पक्षाचे म्हणणें असें आहे की, स्थलवाचक मतदार संघाशिवाय इतर प्रकारचे जे मतदार संघ आहेत ते सर्व जबाबदार राज्यपद्धतीच्या मूल तत्वांशी विसंगत व विरोधी आहेत. दुसऱ्या vars मत असें आहे कीं, ज्या देशांत जातिभेदाचा, धर्मभेदाचा इतका पगडा मनावर बसला आहे कीं, माणसांच्या माणुसकीला किंवा त्यांच्या मताला किंमत न देतां केवळ त्याच्या जातीलाच किंमत देण्यांत येते, त्या देशांत मतदार संघ जातिवाचकच असले पाहिजेत. या दोन्ही पक्षांच्या लोकांना आम्ही दुराग्रही असें समजतो. हिंदुस्थानांत सर्वत्र स्थलवाचक मतदार संघ स्थापन करण्यात यावेत व जातीभेदाच्या परिणामांकडे मुळींच लक्ष पुरविण्यात येऊ नये, हें म्हणणें जितकें भ्रामक व लबाडीचें आहे तितकेच जातिभेद व धर्मभेद मानलाच पाहिजे, नव्हे, त्याशिवाय दुसरा कसल्याही प्रकारचा हितसंबंध मतदार संघ तयार करतांना ध्यानांत येऊं नये, हें म्हणणें मूर्खपणाचे आहे. स्थलवाचक मतदार संघ असल्याखेरीज जबाबदार राज्यपद्धति अस्तित्वांत येऊ शकत नाही, व जातिवाचक संघ असल्याखेरीज जातिभेदाच्या दडपणाखाली गडदुन गेलेल्या जातींना तरणोपाय नाही. हें निर्विकल्पपणें विचार करणाऱ्या कोणाहि माणसास मान्य करणें भाग आहे. अशा निर्विकल्प दृष्टीनें पाहिलें असतां हल्ली अस्तित्वात असलेल्या मतदार संघात अत्यंत अनिष्ट असा एकादा मतदार संघ असेल तर तो मुसलमानांकरिता स्थापन केलेला स्वतंत्र जातिवाचक मतदार संघ हा होय. या देशाच्या राजकारणांत बेजबाबदारी व बेबंदशाही. माजली असेल तर त्याला मुख्य कारण म्हणजे हा मुसलमानांकरितां स्वतंत्र स्थापन केलेला जातिवाचक मतदार संघ होय. वर्गवाचक संघालाहि कमिजास्त प्रमाणानें तोच आक्षेप लागूं पडतो. या मतदार संघामुळे एखाद्या अल्पशा व विशिष्ट प्रकारच्या हितसंबंधानें बद्ध झालेल्या मतदारांतफं निवडून आलेल्या प्रतिनिधींस सार्वजनिक हितसंबंधाच्या प्रश्‍नांवर मत देण्याचा अधिकार प्राप्त होतो. असला हा मतदार