डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ५२६
याचवेळी दुसरीही एक घटना घडत होती. ती म्हणजे पगारकाट, कामवाढ, नोकरकपात इ. स्वरूपाचा भांडवलशाहीचा कामगारांवरील हल्ला, युद्धानंतरच्या आर्थिक परिस्थितीत कामगारांना नवीन सवलती देणे, तर भांडवलशाहांना शक्य नव्हते; पण जुन्या सवलती चालू ठेवणेही अशक्य झाले होते. कारण भांडवलशाहीची वाढ थांबली होती. त्यामुळे अटळ असे तीव्र वर्गयुद्ध सुरू झाले होते. कामगार संप, निदर्शने वगैरे तर करतच होते; पण त्यांनी राजकीय लढाही सुरू केला होता. रशियात तो लढा यशस्वीही झाला होता व तिथे कामगारांचे राज्य स्थापन झाले होते. इतर देशांतील भांडवलदारांना तीच धास्ती वाटत होती. अशा वेळी त्यांना आधार दिला तो फॅसिस्ट विचारसरणीने व फॅसिस्ट पक्षाने, साम्यवादी व समाजवादी विचारांना उत्तर देणारे विचार त्यांना फॅसिझममध्ये आढळले आणि कामगारांच्या चळवळी व संघटना दडपून टाकणारी यंत्रणा त्यांना फॅसिस्ट पक्षाने पुरवली. म्हणून भांडवलशाही व फॅसिझम यांच्यामध्ये निकटचे नाते निर्माण झाले.
मार्क्सवाद्यांचा फॅसिझमबद्दलचा सिद्धांत या अनुभवावरून तयार झाला. त्यांचा सिद्धांत असा की, भांडवलशाहीला उतरती कळा लागते त्यावेळी ती फॅसिझमला जन्म देते. चढत्या काळात तिला लोकशाही कामगारसंघ, कामगारांचे संप वैगरे परवडत होते; पण उतरती कळा लागल्यानंतर त्या गोष्टी परवडणार नाहीत, असे दृष्टीस पडल्यामुळे त्यांच्या विनाशासाठी भांडवलशाहीने फॅसिझम निर्माण केला. या उपपत्तीतील दोष असा की फॅसिझमला . भांडवलशाहीची खूप मदत झाली असली, तरी तिने तो निर्माण केला असे म्हणणे कठीण आहे, तो अगोदरच अस्तित्वात आलेला होता, त्याची उपयुक्तता ओळखून भांडवलशाहीने नंतर त्याला जोपासले. तसेच राजकीय सत्ता हस्तगत केल्यानंतर त्यानेही भांडवलशाहीला वेठीस धरले, ही गोष्ट देखील विसरता कामा नये. शिवाय फॅसिझमला मध्यम वर्गाचा जो पाठींबा लाभला, त्याचेही स्पष्टीकरण या उपपत्तीमुळे होत नाही. केवळ भांडवलदारांचा पक्ष एवढेच त्याचे स्वरूप असते, तर मध्यम वर्गाने फॅसिझमला पाठिंबा दिला नसता; पण त्याचा उग्र राष्ट्रवाद व मध्यम वर्गाला वेगळे व स्वतंत्र स्थान देण्याची घोषणा यांनी मध्यम वर्गीयांच्या मनाला भुरळ पडली आणि त्यांनी फॅसिझमच्या जुलूमजबरदस्तीकडे दुर्लक्ष केले. त्याचे प्रायश्चित त्यांना अर्थातच नंतर भोगावे लागले. फॅसिझम प्रत्यक्षात समाजवाद व साम्यवाद यांचा शत्रू म्हणून वाढला, या गोष्टीमुळे मात्र त्या उपपत्तीला पाठिंबा मिळतो.