परिशिष्टे - Page 576

परिशिष्ट-१८

फ्रेंच राज्यक्रांती

इ.स. १७८९ मध्ये फ्रान्समध्ये झालेली ही राज्यक्रांती म्हणजे अठराव्या शतकातील जगाच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वाची घटना होय. या क्रांतीमुळे निर्माण झालेल्या विचारप्रवाहांचा यूरोपीय देशांवर निरनिराळ्या प्रमाणात प्रभाव पडून यूरोपची सरंजामशाही समाजरचना पूर्ण नष्ट झाली आणि भांडवलशाही समाजरचना औद्योगिक क्रांतीच्या पायावर उभारली जाऊ लागली; म्हणून आधुनिक यूरोपची उभारणी फ्रेंच राज्यक्रांतीपासून झाली असे मानतात. त्याचप्रमाणे क्रांती ही संकल्पना इतिहास व राज्यशास्त्र यांत प्रथम अस्तित्वात आली, ती फ्रेंच राज्यक्रांतीनंतर व राज्यक्रांतीमुळेच !

ही राज्यक्रांती यूरोपच्या इतिहासातील किंबहुना मानवी इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी घटना मानली जाते. राजंकीय, सांस्कृतिक आणि वैचारिक क्षेत्रांत चौदाव्या लूईपासून (१६४३-१७१५) फ्रान्सला यूरोपमध्ये अनन्यसाधारण स्थान प्राप्त झाले होते; म्हणून फ्रेंच राज्यक्रांतीमुळे सर्व यूरोप प्रमावित झाला, यात नवल नाही. फ्रान्समधील बूर्बा घराण्याच्या अनियंत्रित सत्तेला क्रांतीमुळे पायबंद घातला गेला. तेथे चालत आलेली परंपरागत सरदारवर्ग व धर्मगुरू यांची मिरासदारी क्रांतीने संपुष्टात आणली. शहरातील नवीन उदयास येणारा जो उत्पादकवर्ग त्याच्यावरील करांचा बोजा नाहीसा झाल्याने त्याला धंद्यात व राजकारणात पुढे येण्यास वाव मिळाला. जमीन कसणारा शेतकरी क्रांतिकाळातील कायद्यांमुळे आपल्या शेतीचा मालक बनला, यां क्रांतीमुळे: फ्रान्समध्ये लिखित संविधानाची प्रथा सुरू झाली. धार्मिक पुरोहितशाहीविरूध्द बुद्धिवादाची प्रतिष्ठापना क्रांतिकाळात झाल्यामुळे राजकारणावरील चर्चची पकड कायमची ढिली झाली.

कारण मीमांसा : या क्रांतीची कारणे सांगताना वैचारिक प्रबोधनापासून मिळालेली प्रेरणा या गोष्टींवर भर दिला जात असे क्रांतिपर्व सुरू झाल्यानंतर क्रांतिकारकांनी त्या विचारांचा आपल्या प्रश्‍नांची मांडणी करताना उपयोग करून घेतला होता, एवढीच साक्ष इतिहास देतो. त्याहून जास्त श्रेय प्रबोधन आणि विवेकवाद यांना देता येत नाही.