परिशिष्टे - Page 589

परिशिष्ट-१९
नाझीवाद

जर्मनीत १९१९ साली स्थापन झालेला नॅशनल सोशॅलिस्ट वर्कर्स पार्टीच्या मूळ जर्मन आद्याक्षरावरून त्याला नाझी पक्ष असे नाव रूढ झाले. १९२० साली हिटलर या पक्षाचा सभासद आणि नंतर एकमेव नेता झाला.

तत्पूर्वी इटलीत मुसोलिनीच्या फॅसिस्ट पक्षाने सत्ता काबीज करून फॅसिझमच्या हुकूमशाही तत्त्वज्ञानाला सत्ता मिळवून दिली होती, म्हणून काही काळ नाझींना फॅसिस्ट म्हटले जात असे. मुसोलिनीचा फॅसिझम आणि हिटलरचा नाझीवाद यांच्यात बरेच साम्य असले, तरी नाझीवाद पुष्कळसा स्वतंत्र व वेगळ्या प्रकारचा आहे.

हिटलरने आत्मचरित्रात व निरनिराळ्या प्रसंगी केलेल्या भाषणांत आपले विचार आणि कल्पना मांडल्या आहेत. नाझीवादाच्या दृष्टिकोनाचा, विचाराचा प्रारंभ व्यक्तीपासून होत नाही; राष्ट्र हा या प्रणालीचा केंद्रबिंदू आहे. राष्ट्रीय समाज रक्ताच्या बंधनाने एकात्म झालेला असतो, असे त्याचे म्हणणे. व्यक्ती ही या समाजापासून स्वतंत्र वा वेगळी नसते. समाजाचे मन व इच्छा यांचे स्वातंत्र्य हे सर्व व्यक्तींच्या इच्छा वा मने यांच्या स्वातंत्र्यापेक्षा भिन्न व अधिक महत्त्वाचे आहे. हिटलरचा हा विचार म्हणजे अमेरिकन आणि फ्रेंच क्रांतीने मानवतेला दिलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या, व्यक्तीच्या माणूस म्हणून प्रतिष्ठेच्या, संकल्पनांचा संपूर्ण धिक्कार होता.. हिटलरने हे एका भाषणात स्पष्टच केले. तो म्हणतो की, नाझीवादाच्या कार्यक्रमातील महत्त्वाचा भाग व्यक्तीची उदारमतवादी संकल्पना आणि मानवतेची मार्क्सवादी संकल्पना नष्ट करणे हा आहे.

हिटलर समाज अथवा लोक (मूळ जर्मन फोक) हा शब्द वापरीत असला, तरी त्याला संपूर्ण जर्मन समाज अभिप्रेत नव्हता. मानवर्वंशाची उच्चनिचता गृहीत धरूनच त्याने आपल्या तत्त्वज्ञानाची उभारणी केली. नॉर्डिक वंश हाच जगातील सर्वश्रेष्ठ वंश आहे. अन्य वंशातील लोक हे दुय्यम दर्जाचे मानव आहेत व त्यांच्यावर राज्य करण्याचा नॉर्डिक वंशाचा म्हणजे जर्मनांचा ते श्रेष्ठवंशीय असल्यामुळे हक्कच आहे, हा त्याचा सिद्धांत होता. या नॉर्डिक वंशालाच तो आर्य वंश म्हणत असे. भिन्नभिन्न मानववंशात समानता मानणे हा त्याला गुन्हा वाटे. वंशा-वंशांतील समानतेप्रमाणेच मानवा-मानवांतील समता हाही हिटलरच्या दृष्टीने भयंकर गुन्हा होता. भिन्न मानवसमाजांतील व भिन्न व्यक्तींतील असमानता हाच हिटलरच्या वंशसिद्धांताचा अर्थ होता,