१८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
राखीव जागा दिल्या गेल्या तर त्या प्रमाणांत ब्राह्मणांची राजकारणांतली मिरास कमी होणार आहे. अस्पृश्यांना व मागासलेल्या हिंदूंना राजकीय सत्तेपासून होतां होईल तितके दूर ठेवल्याशिवाय ब्राह्मणी वर्चस्व टिकू शकत नाहीं याची जाणीव ब्राह्मण व तत्सम जातीस आहेच. नेहरू कमिटीतील हिंदुसभासदांत ब्राह्मण व तत्सम जातीचा भरणा मोठा आहे. अर्थात कमिटीतील आपल्या सभासदत्वाचा फायदा घेऊन होईल तितका स्वार्थ साधल्याशिवाय ते राहिले नाहींत. मागासलेल्या हिंदूंना व अस्पृश्यांना राखीव जागा न देणें हा त्यांच्या या स्वार्थी वृत्तीचा मासला आहे. यास्तव आम्ही असें म्हणतो कीं नेहरू कमिटीनें मतदार संघांची जी पद्धत सुचविलेली आहे तिच्यांत सरळ राजकारणापेक्षा ब्राह्मणी कावाच जास्त भरला आहे.
मागासलेल्या हिंदूंची व
अस्पृश्यांची पायमल्ली
करून नेहरू कमिटीने हिंदूंचे हित साधलें असते तरी आनंद मानण्यास जागा होती. परंतु तेंहि कमिटीला साधतां आलें नाहीं. मुसलमानांना राजकीय बाबतींत जे हकक आज प्राप्त झालेले आहेत त्याचे उगमस्थान १९१७ सालीं काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्या दरम्यान लखनौ येथें झालेला करार हा होय. हिंदूंची काँग्रेस व मुसलमानांची लीग या दोन संस्थांत १९१७ सालापूर्वी इतका सवतीमत्सर मातला होता कीं एकीचे तोंड पुर्वेस तर दुसरीचें तोंड पश्चिमेस असें. जणू एकीची सावली दुसरीवर पडू नये म्हणून कीं काय ज्या ठिकाणीं एकीचे अधिवेशन होत असे त्या ठिकाणी दुसरीचे अधिवेशन कधींहि होत नसे ! हिंदुस्थानांत स्वराज्य स्थापन करण्याचा जाहीरनामा ता. २० जुलै १९१७ रोजीं जेव्हां प्रसिद्ध झाला त्या वेळेपासून मात्र उभयतांनी आपला सवतीमत्सर थोडा बहुत कमी करुन आपसामध्यें तडजोड करण्यास सुरवात केली. या तडजोडीनें जो लखनौचा करार अस्तित्वांत आला त्या करारान्वयें मुसलमानांवर अनेक सवलतींची खैरात करण्यांत आली. राखीव जागेची सवलत मुसलमानांना अपुरी वाटली म्हणून स्वतंत्र मतदार संघाची मागणी काँग्रेस पक्षातफ कबूल करण्यांत आली. स्वतंत्र मतदार संघाची सवलत ही फक्त अल्पसंख्यांकांकरितां आहे हें मत सर्वमान्य आहे. अर्थात् ज्या प्रांतांत मुसलमान अल्पसंख्यांक होते तेवढ्याच प्रांतांपुरती