व्यक्ती, संस्था, कार्य, सूची - Page 638

५९६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

राहणाऱ्या आप्पाजी गुळवे ह्यांच्या अवलाई नावाच्या मुलीशी त्यांचा दुसरा विवाह झाला. हीच जिजाई.

लहानपणापासून झालेले अध्यात्मविद्येचे संस्कार जागृत होऊन त्यांना उपरती झाली. अभ्यासाची ओढ लागली. ते एकांतवासात रमू लागले. देहूच्या परिसरात सह्याद्रीचे अनेक उंच उंच रम्य पहाड आहेत. त्यांवर जाऊन वाचन-मनन-चिंतनात ते गढून जाऊ लागले. देहूच्या उत्तरेस असलेल्या भामनाथ किंवा भामचंद्र डोंगरावरील लेण्यात ते बसू लागले. ह्यांच ठिकाणी त्यांनी गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, नामदेवादिकांच्या गाथा, योगवासिष्ठ, रामायण, दर्शने इत्यादिकांचा व्यासंग केला. प्रिया, पुत्र, बंधू ह्यांचा संबंध मनातून तुटला. दुकानात बसून केवळ कुटुंबाच्या आणि देहाच्या धारणेपुरते मिळवण्यावर ते संतोष मानू लागले (अभंग १४८६). भनाच्या आणि इंद्रियांच्या विकारांवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करू लागले. संतांचा, हरिभक्तांचा सहवास त्यांना मिळत गेला.

त्यांना कवित्वाची स्फुर्ती झाली. तुकाराम अभंग लिहू लागले. संसार- परमार्थाच्या अनुभवांतून निष्पन्न झालेला विचार रम्य शब्दरूप घेऊ लागला. शब्दांची रत्ने आणि शस्त्रे त्यांना गवसली (अभंग ३३९६). त्यांच्या अभंगांत शब्दांची रत्ने जशी दिसतात, तसेच चमत्कार दाखविणारे बाबालोक; भविष्यशकुन सांगणारे, त्यांचे अपधर्म; पाखंड, धार्मिक, कर्मकांड वा थोतांड इत्यादिकांचे परखड खंडन करणारी शस्त्रास्त्रेही आढळतात. त्यांच्या शैलीचेच सूत्र उपर्युक्त अभंगातून त्यांनी बोलून दाखविले आहे. अभंगातून स्वतःचा उल्लेख ते ' तुका ' असा करतात.

आपल्या जीवनातून आणि अभंगांतून शुद्ध परमार्थधर्मच्या स्थापनेचे कार्य त्यांनी चालू ठेवले. त्यांच्या अलौकिक प्रतिमेलून निर्माण झालेल्या अमृतवाणीने सामान्य जनाचा आणि प्रतिष्ठित, सुसंस्कृत लोकांचा समाज आकर्षित होऊ लागला. ब्रह्मसाक्षात्कारी महान संत कवी म्हणून त्यांची कीर्ती त्यांच्या हयातीतच महाराष्ट्रात पसरली होती. लोकांच्या स्तुतीमुळे आपला झडलेला अहंकार पुन्हा जडेल की काय अशीही त्यांना भीती वाटू लागली होती. तथापि मोहाचा तो टप्पाही त्यांनी ओलांडला. “मी आहे मजूर विठोबाचा ' असे ते लोकांना सांगू लागले. त्यांना महादेव, विठोबा, नारायण हे तीन मुलगे आणि काशी, भागीरथी व गंगा ह्या तीन मुली अशी सहा अपत्ये होती. ह्या मुली मोझे, गाडे व चांभुलीकर ह्या प्रतिष्ठित घराण्यांत दिलेल्या होत्या.