22 डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
उघडकीस आल्याशिवाय राहिलेलें नाहीं. नेहरू कमिटीनें जी योजना सादर केलेली आहे ती योजना मुळची मुसलमान लोकांची आहे, नेहरू कमिटीची नव्हे, हे पुष्कळशा लोकांच्या ध्यानांत आलेले दिसत नाही. परंतु तारीख २० मार्च १९२७ रोजी दिल्ली येथे मुसलमान लोकांनी ज्या मागण्या प्रसिद्ध केल्या त्या व नेहरू कमिटीने प्रसिद्ध केलेल्या योजना ताडून पाहिल्या असतां कोणासहि कळून येईल की हे नेहरू कमिटीने नवें असे कांहींच केलें नाहीं. फक्त मुसलमानांच्या मागण्या मान्य करून त्या आपल्या योजनेंत ग्रथित केल्या आहेत. त्या मागणींत मुसलमान लोकांनी असें जाहीर केलें होतें कीं, सिंध प्रांत वेगळा करण्यांत आला व सरहद्दीवरील प्रांत व बलुचिस्तान स्वयंसत्ताक करण्यांत आले, तर आपण स्वतंत्र मतदारसंघ सोडून देऊन एकत्र मतदारसंघ व राखीव जागा पत्करण्यास तयार होऊ. ही मागणी आम्हांस अतिशय विचित्र अशी वाटत होती. एकत्रित मतदारसंघ पत्करणें व सिंध, बलुचिस्तान व वायव्य सरहद्दीवरील प्रांत यांची निराळी प्रांतरचना करणें या दोन गोष्टींचा परस्पर काय संबंध आहे हें आम्हांस कळत नव्हतें. स्वतंत्रमतदारसंघ केल्यानें मुसलमानांचा होणारा तोटा, निराळी प्रांतरचना झाल्यानें कसा भरून निघेल ह्याचा उलगडा होत नव्हता. परंतु पंजाबांत सायमन कमीशनची जी बैठक झाली त्या बैठकीत मुसलमान पुढाऱ्यांची जी साक्ष झाली त्या साक्षीत या दोन्ही गोष्टींची सांगड कां बांधण्यात आली आहे याचे त्यांनीं स्पष्टीकरण केलें आहे. तें स्पष्टीकरण असें कीं हल्लीच्या प्रांतरचनेत फक्त पंजाब व बंगाल या दोन प्रांतांतच मुसलमान हिंदूंपेक्षां संख्येने अधिक आहेत. सिध, बलुचिस्तान व वायव्य सरहद्दीवरील प्रांत हे वेगळे व स्वतंत्र करण्यांत आले म्हणजे हिंदुस्तानात जे एकंदर नऊ दहा प्रांत आहेत त्यापैकी, पांच प्रांतात मुसलमानांचे प्राबल्य होईल. अशी प्रांतरचना झाली असतांना ज्या प्रांतांत मुसलमान अल्पसंख्यांक आहेत त्या प्रांतातील हिंदूंनी जर मुसलमानांचा छळ केला तर ज्या प्रांतात हिंदूंची कमी संख्या आहे त्या प्रांतातील मुसलमान लोक त्यांना छळावयास लागतील. अशा रीतीनें एकमेकानां शह देतां येईल. व असा शह देतां आला म्हणजे जातवार संघ गेल्यानें होणारा तोटा भरून निघेल. वरील स्पष्टीकरणावरुन एक गोष्ट सिद्ध होते ती ही कीं, मुसलमानांनी सुचविलेली व नेहरू कमिटीने मान्य केलेली प्रांतरचना भाषावारीच्या तत्त्वावर केलेली नसून ज्याप्रमाणें कांही ठिकाणीं मुसलमानांची दाढी हिंदूंच्या हातात आहे त्याप्रमाणें इतर ठिकाणीं हिंदूंची शेंडी मुसलमानांच्या हातांत जाईल, या तत्त्वानुसार करण्यांत आलेली आहे. दरेक हिंदुमात्राला आम्ही असा प्रश्न विचारतों कीं, मुसलमानांना स्वतंत्र मतदार संघ देणें बरें किंवा कांहीं मुसलमानीं प्रांत निर्माण करून तेथील हिंदु लोकांना मुसलमानांच्या ओलीस देणें बरें ? मुसलमानांचें स्वतंत्र मतदारसंघ