समतेसाठींच ही विषमता ३५
ब्राह्मण श्रेष्ठ की भक्त श्रेष्ठ असा तो. लढा होता. ब्राह्मण मानव श्रेष्ठ की शूद्र
मानव श्रेष्ठ हा प्रश्न सोडविण्याच्या भरीस साधूसंत पडले नाहीत. या बंडांत साधूसंतांचा जय झाला व भक्तांचे श्रेष्ठत्व ब्राह्मणांना मान्य करावें लागलें तरी
सुद्धां, या बंडाचा चातुर्वर्ण्यविध्वेसनाच्या दृष्टीनें कांहींच उपयोग झाला नाही. असें म्हणता येईल कीं तुमचें चातुर्वर्ण्य तुम्ही ठेवा आम्हीं भक्त होऊ व तुमच्यातील श्रेष्ठत्व गणल्या गेलेल्या ब्राह्मणांना लाजवू अशी अहमन्यता धरून
संतांनीं चातुर्वर्ण्याला मुळींच धक्का लावला नाही. भक्तीच्या मुलाम्याने माणुसकीला किंमत येते असें नाहीं. तिची किंमत स्वयंसिद्ध आहे हा मुद्दा प्रस्थापित. करण्यासाठी संत भांडले नाहींत. त्यामुळे चातुर्वण्याचि दडपण कायम राहिलें. संतांच्या बंडाचा एक मोठाच दुष्परिणाम झाला. तुम्हीं चोखामेळ्यासारखे भक्त व्हा मग आम्हीं तुम्हांला मानूं असें म्हणून दलितवर्गाची वंचना करण्याचा एक नवा उपाय मात्र त्यामुळे ब्राह्मणांच्या हातीं सांपडला. दलितवर्गातील कुरकुरणारीं तोंडें या उपायानें बंद होतात असा ब्राह्मणांचा अनुभव आहे ; व याच उपायाच्या सहाय्यानें त्यांनी अस्पृश्य व ब्राह्मणेतर हिंदु यांना विषमंतेंत दडपून ठेवलें आहे. आतां या मागासलेल्या वर्गांनी असा विचार केला पाहिजे कीं एकादा चोखामेळ्यासारखा संत आपल्या समाजांत निर्माण झाल्यानें सबंध समाज उन्नत दशेला पोंचतो की काय ? तसा तो पोंचत नाही हें खोल विचार केल्यास कळून येईल. वैयक्तिक कर्तबगारी ही आदरणीय असते, पण पुष्कळ वेळां ती अनुकरणीय नसते ; व म्हणूनच वैयक्तिक कर्तबगारी व सामुदायिक कर्तबगारी यांच्यात तुलना करतां सामुदायिक कर्तबगारी शेंकडों पटींनी श्रेयस्कर ठरते. वैयक्तिक कर्तबगारी आकाशाएवढी उंच असली तरी साधारण उंचीच्या सामुदायिक कर्तबगारीच्या पासंगालाही ती पुरणार नाहीं. | असें असल्यामुळे जी परिस्थिती समाजाच्या सामुदायिक कर्तबगारीला दडपून टाकते ती केव्हांही त्याज्य होय. चोखामेळयासारखा एकादा संत फारतर तिच्यांतून पुढे येईल ; पण सबंध समाजाची वाट काय? एका व्यक्तीसाठीं सबंध समाजानें दलितावस्थेंत रहावयाचे कीं काय? अस्पृश्य व ब्राह्मणेतर या वर्गाच्या इतिहासाकडे पाहिल्यास असें दिसून येतें कीं त्या समाजांत आकाशाएवळ्या उंचीच्या काँही व्यक्ती निर्माण झाल्या असल्या तरी त्या समाजांची सामुदायिक उंची मात्र केव्हांही वाढली नाहीं. चातुर्वर्ण्यजन्य विषमता हें याचें कारण होय. कांही व्यक्ती या विषमतेच्या नाकावर पाय देऊन पुढे येतात. पण शे. ९९ लोकांची कर्तबगारी तिच्यामुळे गारदून जाते. ब्राह्मणेतर व अस्पृश्य या समाजांची कर्तबगारी अशाप्रकारे गारठून जाणें है ब्राह्मणांच्या फायद्यावर असल्यामुळे ही विषमता नष्ट होणें त्यांना पसंत नाहीं. व या विषमतेविरुद्ध ज्यांनी बंड केले त्यांच्या प्रयत्नांच्या अर्धवटपणामुळें ही विषमता नष्ट होऊंही शकली नाहीं. पण आजवर जी ही विषमता टिकून राहिली ती साफ नष्ट होण्याची वेळ आज आली आहे.