समतेसाठीच ही विषमता - Page 78

३६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

दलितवर्गाच्या हातीं राजकीय सत्ता गेली कीं ही चातुर्वर्ण्यजन्य विषमता

धुळीला मिळालीच

असें समजावें. आजवर ती टिकली याचें कारण राजसत्तेचा तिच्यावर कधीच मारा झाला नाही. राजसत्तेची तिच्यावर नेहमीच कृपा होती. हिंदुराजांची होतीच, पण मुसलमान -राजांचीही होती. इंग्रज तर महाधूर्त. त्यांनी दलित जनतेला वर न येऊ देण्यासाठी चातुर्वर्ण्यातील श्रेष्ठ जे ब्राह्मण त्यांच्यावर राजकीय सत्तेची खैरात केली. डॉ. आंबेडकरांची मागणी फलद्रुप झाल्यानें मात्र चातुर्वणर्याचा हा गाडा उलटणार आहे ; व ही भावी स्थिति ओळखण्याइतकी दृष्टी ज्यांना आहे त्यांनीच अस्पृश्यसमाजाला सत्तावान बनवणाऱ्या डॉ. आंबेडकरांच्या योजनेविरुद्ध गिल्ला चालविला आहे.

अस्पृश्यसमाजाला हिंदुसमाजापासून अलग लेखण्यांत यावें अशी जी मागणी डॉ. आंबेडकरांनी केली तिचेही रहस्य पुष्कळांना कळलेले नाहीं. हिंदुसमाजांत राहिल्यास अस्पृश्य समाज हा ब्राह्मण्याच्या कुशींत एक कांटा होऊन राहील असें ज्यांना वाटतें, त्यांना ही मागणी पसंत पडली आहे. तिच्यायोगें आपल्या मागचा ससेमिरा टळेल अशी त्यांना आशा आहे. दुसरे कांही लोक असे आहेत कीं-त्यांना ही मागणी जातवार प्रतिनिधित्वाच्या मागणीप्रमाणेंच तत्वविरोधी वाटते. स्पृश्य समाजाशीं समतेचे नाते. जोडण्याचा प्रयत्न करीत असतां डॉ. आंबेडकर अशी मागणी कशी करतांत असा प्रश्‍न ते विचारीत असतात: पहिल्याप्रकारच्या लोकांना आमचे सांगणें आहे कीं आम्हीं बाहेर जातों, ते आपली वाट आपण सुधारावी या इच्छेने जात नाहीं. आम्हाला ब्राह्मण्यावर मारा करावयाचा आहे. ब्राह्मण्यावर मारा करून त्याच्या तावडींतून देशाची सुटका करणें हें हिंदूँचेंच नव्हे तर मुसलमानांचे व खिश्चनांचेंहीं कर्तव्य आहे. आम्हीं बाहेर जाऊं इच्छितों तें घरांत राहून गुदमरण्यापेक्षां घराबाहेर पडून मारा करण्याच्या हेतूनें. त्याचप्रमाणें दुसऱ्या प्रकारच्या लोकांना आम्ही सांगू इच्छितों कीं, आम्हाला हिंदू समाजाशीं समतेचे नातें जोडावयाचें आहे ते हिंदूसमाजांत राहून, त्याचे गुलाम म्हणून नव्हे. हिंदुसमाजाशी आम्हांला सर्व बाबतींत समानाधिकारी व्हावयाचें आहे. डॉ. आंबेडकरांच्या योजनेचें हेंच ध्येय आहे ; व त्या योजनेंतील वरपांगी विषमतेवर जर तुमचा कटाक्ष असेल तर हो विषमता समतेसाठींच आहे असे आमचें त्यावर उत्तर आहे.

अग्रलेख : बहिष्कृत भारत, ता. १ फेब्रुवारी १९२९.