४२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
खिशांतील अस्पृश्य पुढाऱ्यानें तसा कांहींच खुलासा केला नाही. काय, त्या काळीं अस्पृश्यांना तळीं विहिरी वगैरे सार्वजनिक ठिकाणी बंदी नव्हती ? कीं नोकऱ्यांच्या ठिकाणीं त्यांना अस्पृश्यता येत नसे ? कीं विद्यार्जन करून वाटेल तो दर्जा प्राप्त करून घेण्याची त्यांना मोकळीक होती ? होतें तरी काय ? खरे पाहूं गेल्यास या बाबतींत अस्पृश्यांना आज ज्या सवलती आहेत तितक्या पूर्वी कधीच नव्हत्या. इंग्रज सरकारनें अस्पृश्यता नाहीशी करण्यासाठी जितके प्रयत्न केले पाहिजे होते तितके केले नाहींत ही गोष्ट खरी. आणि इंग्रजसरकार जें कांहीं नाइलाजास्तव कां होईना करीत आहे, ती अस्पृश्यांवर मेहरबानी होय असेंही आम्ही मानून चालत नाही. पण इंग्रज सरकारच्या हातून जें कांहीं अल्पस्वल्प कार्य घडले आहे तसें पेशव्यांच्या हातून कांहींच घडलें नाही. पेशवाईत अस्पृश्यांच्या गळ्यांत मडकीं बांधण्यांत येत असत हैं म्हणणें एक सत्यशोधकी थोतांड आहे. असे पेशवाईछाप ब्राह्मणांना वाटतें. पण प्रभूसारख्या पुढारलेल्या जातीचाही छळ करण्यास ज्यांनीं मागें पुढे पाहिलें नाही व मराठयांना शुद्रत्वाच्या कोटींत ढकलण्यास ज्यांनीं जंगजंग पछाडले त्याच पेशव्यांनीं, प्रभू मराठेही ज्यांना तुच्छ लेखतात, त्या अस्पृश्यांच्या गळ्यांत मडकी बांधावी हैं त्यांच्या कृतीशीं सर्वथै व सुसंगत आहे. माटे मास्तरांनीं एका अस्पृश्य पुढाऱ्याच्या साहाय्यानें हा जो शोध लाविला आहे तो पेशवाईचा इतिहास वाचून लाविला नसून एकाद्या भटानें लिहिलेली कादंबरीमय पेशवाई वाचून लावला असावा असेंच म्हटलें पाहिजे.
माटे मास्तरांच्या या व्याख्यानाच्या वेळीं श्री. ग. वि. केतकर केसरीचे माजी संपादक, हे अध्यक्ष होते. माटे मास्तरांनीं पेशवे आणि इंग्रज यांच्यांत तुलना करून पेशवे बरे असें सांगितलें असलें तर केतकरांनी ब्राह्मणी धर्मवाले स्पृश्य हिंदू व अफ्रिकेतील गोरे यांची तुलना करून स्पृश्य हिंदू बरे असें सांगितलें. निग्रो वगैरे लोकांना गोऱ्या जेत्यांनीं दुष्टपणानें व क्रुरपणानें वागविलें असलें तर आम्हीं अस्पृश्यादी लोकांना सदयतेनें वागविलें आहे असें ते म्हणाले. श्री. केतकरांचें हैं म्हणणें मोठें आमक व लबाडीचें आहे. आणि म्हणूनच त्याच्यामुळें पुष्कळांची मनें गोंधळण्याचा संभव आहे. वरवर पहाणाऱ्या कोणालाही असें वाटेल कीं आफ्रिकेतील गोरे लोक निग्रो गुलामांना चाबकाने झोडपतात, लाथांनीं मारतात, व त्यांचे मनस्वी शारिरिक हाल करितात; पण आमचे स्पृश्य हिंदू अस्पृश्यांच्या बाबतींत यापैकीं एकही गोष्ट करीत नाहींत. ' सर्वांभूती अन्तरात्मा ' हें तत्व ध्यानांत ठेऊन ते वागत असतात. पण हा समज साफ चुकीचा आहे. गोऱ्या लोकांच्या हातून निग्रो गुलामांचा जितका छळ होतो त्याच्या शतपट स्पृश्यांच्या हातून अस्पृश्यांचा होत असतो. फरक एवढाच कीं निग्रो गुलामांचा छळ