33
देशद्रोहात्मक सनातन धर्म विरुद्ध क्रांतिवाद
अफगाणिस्थानचे अमीर अमानुल्ला हे आपल्या क्रांतीवादी मतांबद्दल प्रसिद्ध आहेत. पण त्यांना राज्यत्याग करावा लागला यावरून त्यांचा क्रांतीवाद अफगाण लोकांच्या पचनीं पडला नाहीं असें दिसतें. या त्यांच्या राज्यत्यागाच्या मुळाशीं कांहीं बड्या राष्ट्रांचे एक TS कारस्थान आहे असा ध्वनी मधून मधून ऐकूं येतो. पण ते खरें असलें तरी अफगाण लोकांच्या पुराणमतवादाचा त्या कारस्थानांना चांगलाच उपयोग झाला यांत शंका नाहीं. अमानुल्लानीं ज्या सुधारणांचा पुरस्कार केला त्या तेथील मुल्लामौलवींना नको होत्या. त्यांच्यामुळे अफगाण लोकांचे कल्याण होणार होते व अमानुल्लांना तेंच करावयाचें होते. पण मुल्लामौलवी प्रभृतींना देशाच्या कल्याणापेक्षां स्वतःच्या स्वार्थाचीच पर्वा जास्त असते असा आजपर्यंतचा अनुभव आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी देशाच्या कल्याणावर निखारे ठेवण्यास हे लोक कधींच मागें पुढे पाहत नाहींत. व अंमानुल्ला विरूद्ध अफगाण प्रजेला चिथावून त्यांनीं आपला हा देशद्रोहात्मक सनातन धर्म जगाच्या निदर्शनास आणून दिला आहे. असल्या लोकांची शक्ती किती मोठी असते व तिच्याविरूद्ध क्रांतिवाद विजयी व्हायचा असेल तर त्याच्या पुरस्कर्त्यांनी केवढी तयारी केली पाहिजे हे अमानुल्लाच्या उदाहरणावरून लक्षांत येण्यासारखे आहे. |
प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १ फेब्रुवारी १९२९.