मुंबई शहरांतील दंगे - Page 94

१५
मुंबई शहरांतील दंगे

हिंदुमुसलमानांच्या दंग्याचा काळिमा हल्लीं पुष्कळ वर्षे मुंबई शहरास लागलेला नव्हता. इतर अनेक ठिकाणीं हिंदुमुसलमानांचे दंगे झाले तरी मुंबई शहरांत दोन्हीं धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने नांदत होते. परंतु अकल्पित रीतीने मुंबई शहरांत फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यांत हिंदु मुसलमानांच्या दंग्याची आग पेटली. शिवडी येथील तेलाच्या कंपन्यांमधील कामगारांचा संप झाला असतां त्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी संपवाल्याच्या जागीं पठाण लोक नेमून संपवाल्यांची खोड मोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळें संपवाले हिंदुमुसलमान कामगार व त्यांच्या जागीं काम करणारे पठाण यांच्यामध्यें मारामाऱ्या झाल्या. तितक्यांतच Tews, भेंडीबाजार वगैरे भागांत पठाण लोक मुलें पळवून नेतात अशी हूल उठून ती सर्व शहरभर पसरली. पढठाणांना त्यामुळें ठिकठिकाणीं मार पडूं लागला व कित्येक पठाण मारानें ठारहि झाले. पठाण पाहिला कीं त्याला मारावयाचें असा प्रकार चालू झाल्यामुळें पठाणांचें धर्मबंधू जे मुसलमान त्यांनी पठाणांची कड घेतली. त्यामुळें हिंदुमुसलमानांच्या दंग्याचें या गडबडीला भयंकर स्वरूप आलें. या दंग्यांत उभय पक्षांकडील मिळून सुमारें १५० लोक प्राणांस मुकले व शेंकडों लोकांना जबर जखमा झाल्या. मेलेल्या व जखमी लोकांपैकी बहुतेक लोक निरुपद्रवी होते. एकट्या दुकट्याला पुष्कळशा लोकांनीं गांठावयाचे व त्याला मरेपर्यंत मार द्यावयाचा किंवा अचानक रीतीनें सुरीने भोसकाभोसकी करावयाची, अशा प्रकारचा खाटिकपणाच या दंग्यांत दिसून आला. शांतता करण्याकरितां दंग्याच्या जागीं गेलेल्या थोड्या तरुण, सद्धेतुपूर्ण स्वयंसेवकांचेही दंगेखोरांनीं बळी घेतले ! त्यांतल्या त्यांत समाधानाची गोष्ट ही कीं, पुष्कळ हिंदूंनी मुसलमानांचे व मुसलमानांनी हिंदुंचे शेजारधर्माला स्मरून संरक्षण केलें, नाहींपेक्षां हजारों निरपराधी माणसांचें प्राण गेले असते. उभय पक्षांतले सुशिक्षित आगलावे या दंग्याच्या वेळीं चिडवाचिडवी करीत होते व त्यामुळेच संपाचा वणवा इतकां भडकला हें मात्र येथें अवश्य नमूद केलें पाहिजे.