स्वाभिमानसंघाची चळवळ - Page 98

१७ |
स्वाभिमानसंघाची चळवळ

गेल्या ता. १७ फेब्रुवारी १९२९ रोजी मद्रास इलाख्यांत चिंगलपुट येथें स्वाभिमानसंघाची ( Self-respect League ) पहिली परिषद भरली. या परिषदेला मद्रास सरकारचे लॉ. मेंबर दि. ब. कृष्णन्‌ नायर, मुख्य दिवाण डॉ. सुबारायन्‌, आरोग्य खात्याचे दिवाण मि. मुथिया मुदलियार, मि. पी. टी. राजन्‌, मि. रामस्वामी नायकर वगैरे पुढारी मंडळी हजर होते. मि. राजन्‌ यांच्या हस्तें स्वाभिमानाचा झेंडा उभारण्यांत आला आणि त्यांनी, या परिषदेचा उद्देश सामाजिक विषमता व अन्याय यांचें निमूर्लन करणें हा आहे, असे जाहीर केलें व परिषदेच्या कामाला सुरवात करून देतांना डॉ. सुबारायन्‌ म्हणाले, “सामाजिक स्वाभिमानाखेरीज राजकीय स्वाभिमान उत्पन्न व्हावयाचा नाही, ज्या समाजपद्धतींत जातिभेदाचा बुजबंजाट झालेला आहे त्या पद्धतींतून लोकशाहीला पोषक असा ऐक्यसंपन्न समाज निर्माण होणें कधींही शक्‍य नाहीं.“ ही स्वाभिमानसंघाची चळवळ म्हणजे समाजसमतावादाचीच चळवळ होय. स्वाभिमान म्हणजे दुरभिमान नव्हे, अहंकार नव्हे, इतरांना तुच्छ लेखण्याची प्रवृत्ति नव्हे. स्वाभिमान ही पवित्र भावना आहे. आपण मनुष्य आहो, आपल्याला माणुसकीचे हकक आहेत, आपले माणुसकीचे हक्क हिरावून घेण्याचा कोणाला अधिकार नाही, सर्वांना स्वतःची उन्नति करण्याची पूर्ण मोकळीक असली पाहिजे, असें वाटणें हा स्वाभिमान. खरा स्वाभिमानी मनुष्य दुसऱ्याच्या स्वाभिमानालाही जपत असतो, कारण त्याला स्वाभिमानाची किंमत ठाऊक असते. हिंदुसमाजाचा स्वाभिमान नष्टप्राय झाला आहे. म्हणूनच एक जात दुसऱ्या जातीला कमी मानते आणि अशा रीतीने दुसऱ्यांना कमी मानण्यांत आपला मोठेपणा आहे अशी खोटी समजूत सर्वत्र फैलावली आहे. ही समजूत घालविण्याकरितां आणि हिंदुसमाजांत खरी तेजस्विता उत्पन्न करण्याकरितां स्वाभिमानसंघ, समाज समतासंघ, जातपात तोडक मंडळ अशा चळवळींची आवश्यकता आहे.

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १ मार्च १९२९.