मद्रासची अस्पृश्यता निवारक परिषद - Page 99

१८
मद्रासची अस्पृश्यतानिवारक [परिषद ]

स्वाभिमानपरिषदेच्या थोडे दिवसापूर्वी मद्रास येथें अस्पृश्यतानिवारक परिषदेचे दुसरें अधिवेशन भरलें होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानीं कलकत्त्याच्या कुमारी ज्योतिर्मयी गांगुली यांची योजना करण्यांत आली होती. सुप्रसिद्ध टागोर घराण्यांत या बाईचे आजोळ असून त्या उदारमतवादी आहेत. . मद्रासच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष मि. रामस्वामी मुदलियार यांनीं अस्पृश्यतानिवारणाचा ध्वज रोंवला आणि मद्राससरकारचे एक माजी दिवाण सर परशुराम पात्रो यांनी परिषदेच्या कामाला सुरवात करून दिली. त्यानंतर अध्यक्ष बाईचें अस्पृश्यतेच्या निर्मूलनाची आवश्यकता प्रतिपादणारें सुंदर भाषण झालें. त्या म्हणाल्या कीं, “अस्पृश्यता म्हणजे हिंदी राष्ट्रपुरुषाला झालेला पक्षघाताचा रोग आहे. या रोगामुळेंराष्ट्रपुरुषाचा देह हळुहळू परंतू खात्रीने मृत्युपंथाला लागला आहे. थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे अस्पृश्यतेनें हिंदुसमाजाच्या सामाजिक, नैतिक व आत्मिक जीवनांत विष कालविलें आहे. अस्पृश्यतेचे त्वरीत उच्चाटन झालें तरच हिंदी राष्ट्राची धडगत आहे. “ या परिषदेंत अनेक ठराव पसार झाले. त्यांतला मुख्य ठराव, अस्पृश्यतेच्या सबबीवर विशिष्ट वर्गांना नागरिकत्वाचे इक्क न देण्याच्या प्रवृत्तीचा निषेध करणारा आणि देवालयांसुद्धां सर्व सार्वजनिक संस्थांमध्ये प्रवेश करण्याचा हक्क अस्पृश्यांना. असावा असें प्रतिपादणारा होता. पूर्ण राजकीय स्वातंत्र्याच्या वलाना करणारे एस. श्रीनिवास अय्यंगार, सत्यमूर्ति यांच्यासारखे सोंगाडे राष्ट्रीय पुढारी या परिषदेंत कोठें दिसले नाहींत हें लक्षांत ठेवण्यासारखे आहे. राष्ट्रपुरुषाला झालेला पक्षघाताचा रोग त्यांना कायमचा ठेवावयाचा आहे. फक्त मोठमोठ्याने व रागाने ओरडल्यानें राष्ट्रपुरुष सामर्थ्यवान्‌ होईल असें या देशभक्तांना वाटत असावें !

प्रासंगिक विचार : बहिष्कृत भारत, ता. १ मार्च १९२९.